एकदिवसीय मालिकेतील सलामीच्या सामन्यासाठी भारतीय संघाने जोरदार तयारी केली. मालिकेत विजयी सलामी देण्यासाठी भारताने शक्य तितके प्रयत्न केले. मात्र टीम इंडिया ऑनफिल्ड अपयशी ठरली. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्याच सामन्यात अपयशी ठरली. रविवारी 19 ऑक्टोबरला झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने डीएलएसनुसार टीम इंडियावर 7 विकेट्सने विजय नोंदवला. पावसामुळे हा सामना 26 ओव्हरचा करण्यात आला. पहिल्या डावात टीम इंडियाच्या बॅटिंग दरम्यान पावसाने तब्बल 5 वेळा खोडा घातल्याने 24 ओव्हरचा खेळ वाया गेला. भारताने 136 धावा केल्या. मात्र ऑस्ट्रेलियाला डीएलएसनुसार 131 धावांचं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 3 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं.
ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता टीम इंडियाला मालिकेत आव्हान कायम ठेवण्यासाठी दुसऱ्या सामन्यात कोणत्याही स्थितीत जिंकावं लागणार आहे. टीम इंडियासमोर एडलेड ओव्हलमध्ये होणाऱ्या सामन्यात विजयी होण्याचं आव्हान आहे. त्यासाठी टीम इंडियात 2 बदल केले जाऊ शकतात. पहिल्या सामन्यात निराशाजनक तसेच प्रभावपूर्ण कामगिरी न करणाऱ्या खेळाडूंना डच्चू दिला जाऊ शकतो. ते दोघे कोण आहेत आणि त्यांच्या जागी कुणाला संधी द्यायला हवी? हे आपण जाणून घेऊयात.
पहिल्या सामन्यात निसर्गाने भारतावर एका प्रकारे अन्याय केला. टीम इंडियाच्या बॅटिंग दरम्यान पावसाने 5 वेळा व्यत्यय आणला. त्यामुळे भारतीय फंलदाजांना सातत्याने खेळण्यात अडथळा आला. तर सामन्यातील दुसरा डाव कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण झाला. त्यामुळे दोन्ही संघ वेगवेगळ्या स्थितीत खेळले.
अपवाद वगळता टीम इंडियाला पहिल्या सामन्यात बॅटिंग आणि बॉलिंगने काही खास करता आलं नाही. वेगवान गोलंदाज हर्षित राणा याने निराशा केली. हर्षितला विकेट घेता आली नाही. हर्षितने धावा लुटवल्या. तसेच हर्षित ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अडचणीतही आणू शकला नाही. त्यामुळे इतर गोलंदाजांवर त्याचा दबाव आला. त्यामुळे हर्षितला दुसऱ्या सामन्यातून वगळायला हवं, अशी मागणी केली जात आहे. मात्र हेड कोच हर्षितबाबत इतका ‘गंभीर’ निर्णय घेणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. तसेच हर्षितच्या जागी प्रसिध कृष्णाला संधी मिळणार का? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.
वॉशिंग्टन सुंदर याला ऑलराउंडर म्हणून संधी देण्यात आली आहे. मात्र सुंदरला पहिल्या सामन्यात छाप सोडता आली नाही. सुंदरने 10 बॉलमध्ये 10 रन्स केल्या. तसेच सुंदरने 1 विकेट मिळवली. मात्र सुंदर आपल्या फिरकीत कांगारुंना फसवण्यात तितका यशस्वी ठरला नाही. त्यामुळे सुंदरऐवजी कुलदीप यादव याला संधी द्यायला हवी, असं क्रिकेट चाहत्यांचं म्हणणं आहे.