ठाणे महापालिका आर्थिक ताणात
शहर विकास विभागाला पाच महिन्यांत ४५० कोटी वसुलीचे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : ठाणे पालिकेच्या शहर विकास विभागाने यंदाच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांतच ६५० कोटींच्या उद्दिष्टांपैकी २०० कोटींची वसुली केली आहे. असे असले तरी, आगामी पाच महिन्यांत या विभागापुढे आणखी ४५० कोटींची वसुली करण्याचे आव्हान कायम आहे.
कोरोनापासून आजतागायत ठाणे पालिकेची आर्थिक स्थिती डोलायमान असल्याचे दिसून येत आहे. अशातच विकासकामांसाठी केंद्र सरकारकडून शून्य व्याजदारावर अनुदान मिळविण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे महापालिकेच्या प्रमुख उत्पनाचे स्रोत पाहता मालमत्ता कर, शहर विकास विभागाचे शुल्क, पाणीपुरवठा आकार आणि स्थानिक संस्था कर हे आहेत. २०२५-२६ च्या अर्थसंकल्पानुसार महापालिकेचे एकूण अपेक्षित उत्पन्न तीन हजार २८१ कोटी ९३ लाख आहे. त्यात मालमत्ता करातून ८४१ कोटी ५८ लाख, शहर विकास व तत्सम शुल्कातून ६५० कोटी ८० लाख, स्थानिक संस्था करातून एक हजार ४४१ कोटी ७९ लाख, पाणीपुरवठा करातून २५० कोटी, अग्निशमन दल शुल्क १२७ कोटी ३ लाख, जाहिरात फी २२ कोटी, स्थावर मालमत्ता भाडे १५ कोटी ४१ लाख, असे मिळून तीन हजार ५२३ कोटी ७९ लाख रुपयांचे एकत्रित उत्पन्न अपेक्षित धरले आहे.
शहर विकास विभागाला मिळणारे उत्पन्न हे प्रामुख्याने विकास शुल्क, अतिरिक्त भूनिर्देशांक, वाढीव भूनिर्देशांक, छाननी शुल्क, इत्यादी माध्यमातून मिळते, मात्र मागील काही वर्षांपासून सरकारकडून विविध सवलती व सूट देण्यात आल्याने या विभागाच्या उत्पन्नावर लक्षणीय परिणाम झाल्याचे सूत्रांकडून समजते. तर, राज्य सरकार व इतर विभागांकडून ठाणे महापालिकेला ६१२ कोटी ५९ लाखांचे अनुदान मिळण्याची अपेक्षा आहे. शहर विकास विभागाच्या विद्यमान वसुलीच्या तुलनेत उरलेल्या लक्ष्याची पूर्तता करण्यासाठी पुढील काही महिने निर्णायक ठरणार आहेत. मालमत्ता कर आणि पाणी बिलांतील थकबाकी वसुली गतिमान केली, तरच महापालिकेला अपेक्षित महसूल मिळू शकेल, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.