Odi Cricket : पहिल्या पराभवानंतर संघात मोठा बदल, टीममध्ये स्टार स्पिनरची एन्ट्री!
GH News October 20, 2025 09:12 PM

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांची 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सारखीच सुरुवात झाली. दोन्ही संघांना आपला पहिला सामना गमवावा लागला. वेस्ट इंडिज सध्या बांगलादेश तर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. बांगलादेशने वेस्ट इंडिजवर 18 ऑक्टोबरला 74 धावांनी विजय मिळवला आणि 1-0 ने आघाडी घेतली. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाने रविवारी 19 ऑक्टोबरला भारतीय संघावर डीएलएसनुसार 7 विकेट्सने मात केली. दोन्ही संघांनी पहिला सामना गमावल्याने आता मालिका जिंकण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. त्याआधी कोणत्याही स्थितीत दुसरा सामना जिंकावा लागणार आहे. या दुसऱ्या सामन्याआधी टीममध्ये स्टार स्पिनर जोडला जाणार आहे.

अकील होसैनची टीममध्ये एन्ट्री होणार!

वेस्ट इंडिजचा फिरकीपटू अकील होसैन बांगलादेश विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात सामील होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अकील 20 ऑक्टोबरला ढाक्यात टीममध्ये सामील होणार आहे. अकील सोमवारी रात्रीपर्यंत टीमसह जोडला जाणार असल्याची माहिती क्रिकबझने बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिली आहे. अकील आल्याने बॉलिंगची ताकद वाढेल असा विश्वास टीम मॅनेजमेंटला आहे. त्यामुळे अकीलकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशनेही आपल्यासोबत फिरकीपटू नासुम अहमद याला जोडलं आहे. तसेच वेगवान गोलंदाज रेमन सिमंड्स याचा पहिल्यांदाच एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. रेमनला याआधी टी 20I सामेन खेळण्याचा अनुभव आहे.

वनडेनंतर टी 20i मालिकेचा थरार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विंडीजचा अनुभवी खेळाडू जेसन होल्डर 21 ऑक्टोबरपर्यंत संघात सामील होणार आहे. होल्डर टी 20I मालिकेत खेळण्याची शक्यता अधिक आहे. उभयसंघातील एकदिवसीय मालिकेचा शेवट 23 ऑक्टोबरला होणार आहे. त्यानंतर या दोन्ही संघात 3 सामन्यांच्या टी 20I मालिकेचा थरार रंगणार आहे. उभयसंघात 27 ते 31 ऑक्टोबर दरम्यान ही मालिका खेळवण्यात येणार आहे.

टी 20I मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, सोमवार, 27 ऑक्टोबर, चट्टोग्राम.

दुसरा सामना, बुधवार, 29 ऑक्टोबर, चट्टोग्राम.

तिसरा सामना, शुक्रवार, 31 ऑक्टोबर, चट्टोग्राम.

अकील होसैनची एकदिवसीय कारकीर्द

दरम्यान अकील हौसेन याने वेस्ट इंडिजचं 38 एकदिवसीय आणि 81 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. अकीलने आतापर्यंत विंडीजसाठी 57 एकदिवसीय आणि 76 टी 20i विकेट्स घेतल्या आहेत. अकीलने टी 20i क्रिकेटमध्ये 1 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.