एक मजली चाळीचा स्लॅब कोसळून दोनजण जखमी
कळवा, ता. २० (बातमीदार) ः कळवा परिसरातील विटाव्यात एका एक मजली चाळीतील एका खोलीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये पती-पत्नी जखमी झाल्याची माहिती मिळली असून शनिवारी (ता १८) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.
विटाव्यातील धर्मा निवास ही ३० ते ३५ वर्ष जुने बांधकाम असलेली एकमजली चाळ आहे. खोली क्रमांक १०४ चे मालक सूर्यकांत वाळुंज यांच्या मालकीच्या खोलीचा स्लॅब अचानक कोसळल्याने संजय उतेकर (वय ४०) व योगिता उतेकर (वय ३८) हे दांपत्य लादीसह तळमजल्यावर पडून जखमी झाले. त्यांच्यावर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या इमारतीत एकूण २० सदनिका असून ४५ ते ५० रहिवासी राहतात. या घटनेचे वृत्त समजताच कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त ललिता जाधव, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी तडवी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी घटनास्थळी धाव घेत ही धोकादायक सदनिका रिकाम्या केल्या आहेत.