पुणे : सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकवून ज्येष्ठ नागरिकांना लाखो-कोट्यवधी रुपयांना गंडा घालण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. सायबर गुन्हेगार मोबाईल कॉल्स आणि संदेश पाठवून ज्येष्ठांना लक्ष्य करीत आहेत. निवृत्तिवेतन, आयुष्यभरातील कष्टाची बचतीतली रक्कम क्षणांत हातोहात गायब होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे आता बँकांनी सजग राहून संशयास्पद व्यवहारांवर त्वरित कारवाई करणे आणि पोलिसांशी समन्वय राखणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
ज्येष्ठांच्या खात्यातून मोठ्या प्रमाणात रकमा अचानक इतरांच्या खात्यात जमा होत असल्यास, बँकांनी लगेच त्या व्यवहाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. संशयास्पद व्यवहार दिसताच संबंधित खातेदाराशी प्रत्यक्ष संपर्क साधणे, व्यवहार तात्पुरता रोखणे आणि पोलिसांना कळवणे ही बँकांची जबाबदारी असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे स्पष्ट मत आहे. बँका सावध राहिल्यास अशा फसवणुकीची अनेक प्रकरणे रोखता येऊ शकतात.
सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटना पाहता ज्येष्ठ नागरिक हे सर्वाधिक लक्ष्य ठरत आहेत. त्यामुळे बँकांचा सतर्कपणा, पोलिसांशी समन्वय आणि नागरिकांची जागरूकता या त्रिसूत्रीनेच सायबर फसवणुकीचा धोका टाळता येईल, असा सल्ला सायबर तज्ज्ञांनी दिला आहे.
Solapur Crime: साेलापुरात इन्स्टाग्रामवर ओळख करून विनयभंग; ॲट्रॉसिटीसह पोक्सोचाही गुन्हा दाखल, तरुणाला कोठडी ‘ज्येष्ठांनी घ्यावी खबरदारी’‘‘सायबर फसवणूक टाळण्यासाठी ज्येष्ठांनी अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती, पासवर्ड, ओटीपी कधीच देऊ नये. बँकेचे अधिकारी म्हणून कोणी फोन करत असेल तरी खात्रीशीर पडताळणी करावी. कोणत्याही संशयास्पद व्यवहाराबाबत तत्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे,’’ असे सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी सांगितले.
बँकांकडून समन्वय आवश्यक‘‘ ग्राहकांचे हित जपणे ही आमची जबाबदारी आहे. मात्र फसवणूक रोखण्यासाठी बँका आणि पोलिस यांच्यात सुसंवाद व समन्वय आवश्यक आहे. संशयास्पद व्यवहार त्वरित पोलिसांना कळवल्यास नुकसान कमी करता येऊ शकते,’’ असे बॅंकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी :- अनोळखी फोन कॉलवर विश्वास ठेवू नये.
- बँकेच्या नावाने आलेल्या मेसेज किंवा लिंकवर क्लिक करू नये.
- कधीही ओटीपी, एटीएम पिन किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड इतरांना सांगू नये.
- मोठे व्यवहार करण्यापूर्वी बँकेत प्रत्यक्ष संपर्क साधावा.
- संशयास्पद व्यवहार दिसताच सायबर हेल्पलाइन १९३० या क्रमांकावर संपर्क साधावा.