मुलुंड : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने यंदा स्थायी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी ३१ हजार रुपयांचा बोनस जाहीर केला. या निर्णयाचे स्वागत झाले असले तरी आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे शहरातील आरोग्य व्यवस्थेची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे जवळपास पाच हजार कंत्राटी आरोग्य कर्मचारी बोनसपासून वंचित राहिले आहेत.
बोनस मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या यादीत आरोग्य विभागातील आशा स्वयंसेविका, राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत काम करणारे कर्मचारी, क्षयरोग विभागातील कंत्राटी कर्मचारी, प्लाझ्मा ब्लड बँकेतील कर्मचारी, तसेच खासगी कंत्राटदारामार्फत सेवा देणारे नर्स, फार्मासिस्ट, परिचारिका आणि वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश नाही. कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या ह्याच कर्मचाऱ्यांनी मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेला आधार दिला होता, मात्र आज त्यांनाच दिवाळी बोनसपासून वंचित ठेवण्यात आल्याने अन्याय झाल्याची भावना कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
सिडकोच्या योजनेविरोधात उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! शेतकऱ्यांना भरीव मोबदला मिळण्याची शक्यता, प्रकरण काय?महापालिकेच्यानियमांनुसार ८.५ टक्के बोनस देणे बंधनकारक असतानाही कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे. बोनसच्या मागणीसाठी लढा देताना त्यांनी संघर्षाचा मार्ग टाळून गांधीगिरीचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. शांततापूर्ण पद्धतीने आपली मागणी मांडत ते लवकरच महानगरपालिकेकडे निवेदन सादर करणार आहेत.
सोमवारी (ता. २०) म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या नेतृत्वाखाली संबंधित विभागाचे सर्व कामगार कर्मचारी महापालिका आयुक्त यांना भेटून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करणार आहेत. कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून त्यांनाही दिवाळी बोनस मंजूर करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. अन्यथा दिवाळीनंतर तीव्र आंदोलनाची हाक देण्यात येईल, असा इशारादेखील या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
ग्रीन फटाके आणि सामान्य फटाके यात फरक काय?