Gopichand Padalkar : 'आता कोणालाही सुटी नाही, संघर्ष अटळ असेल'; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना थेट इशारा
esakal October 21, 2025 05:45 AM
  • जत साखर कारखाना विक्रीवरून राजकीय वाद तापला

  • आमदार गोपीचंद पडळकरांचा संघर्षाचा इशारा

  • कारखाना सभासदांना परत मिळवण्यासाठी न्यायालयीन लढाई आणि आंदोलनाची तयारी

  • जत : जत तालुक्यातील जनतेच्या कष्टातून उभारलेला राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना तत्कालीन अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या मनमानीने दिवाळखोरीत निघाला. पुढे कवडीमोल किंमतीत विकला गेला. हा कारखाना सभासदांना परत मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढाई तर लढू. प्रसंगी रस्त्यावर उतरू. आता कोणालाही सुटी नाही, संघर्ष अटळ असेल, असे आव्हान आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता पत्रकार बैठकीत दिले.

    आमदार पडळकर म्हणाले, ‘‘वीस हजारांहून अधिक सभासद शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जीवाची पर्वा करणार नाही. माझ्याकडे कागदपत्रे आली आहेत. लवकरच कारखाना परत मिळविण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांचा संघर्ष उभा करू. आगामी हंगामात कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही. जिल्ह्यात घेरण्यासाठी मोठ्या आघाड्या तयार केल्या जात आहेत. मात्र, त्यांना आवाहन आहे, की त्यांनी जतचा कारखाना सभासदांना परत मिळवून देण्यासाठी वेळ द्यावा. तालुक्यातील जनतेने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांना या प्रश्नावरून जाब विचारावा.’’

    Maratha Reservation : 'हैदराबाद गॅझेटचा जीआर फसवा आहे का?' मराठा आंदोलकांचा राधाकृष्ण विखे पाटलांना घेराव

    पडळकर म्हणाले, ‘‘ही भूमिका भाजपचीच असून यापुढील काळात जतचा साखर कारखाना सभासदांच्या नावावर होईपर्यंत धुराडे पेटू देणार नाही. ज्यांनी कारखान्याबरोबर करार केलेत, त्यांनी विचार करावा. कारखान्यात काम करणारे कामगार बाहेरचे आहेत. भूमिपुत्रावर अन्याय होत असताना प्रस्थापित गप्प का? कारखान्याच्या परिसरातून काढलेल्या कालव्याचे कोट्यवधी रुपये यांना मिळालेत. शंभरावर ऊस वाहतूक करार करणाऱ्या वाहन मालकांकडे कारखान्याचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत, ते का वसूल केले नाहीत?’’ केंद्रीय सिमेंट बोर्डाचे संचालक डॉ. रवींद्र आरळी, चंद्रशेखर गोब्बी, माजी नगरसेवक परशुराम मोरे, भाजप जत शहराध्यक्ष अण्णा भिसे, हेमंत भोसले उपस्थित होते.

    © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.