टीम इंडिया पहिल्या सामन्यात 7 विकेट्सने पराभूत झाल्यानंतर आता कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. पर्थमध्ये झालेल्या सामन्यात भारताला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. तसेच पावसामुळे पहिल्या डावात टीम इंडियाच्या बॅटिंग दरम्यान सातत्याने खेळ होऊ शकला नाही. त्याचा फटका टीम इंडियाला बसला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला डीएलएसनुसार 26 ओव्हरमध्ये 131 धावांचं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान सहज पूर्ण करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने या पहिल्या सामन्यात टीम इंडियात कमबॅक केलं. या जोडीकडून भारताला मोठ्या खेळीची आशा होती. मात्र दोघांनीही घोर निराशा केली. रोहित 8 धावांवर आऊट झाला. विराटला भोपळाही फोडता आला नाही.
रोहित आणि विराटने पहिल्या सामन्यातील अपयशानंतर दुसऱ्या सामन्याआधी जोरदार सराव केला. एडलेडमध्ये मंगळवारी 21 ऑक्टोबर रोजी टीम इंडियाच्या अनुभवी जोडीने इतर सहकाऱ्यांसह सराव केला. टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल यानेही सराव केला. मात्र यशस्वीला या मालिकेत बॅकअप ओपनर म्हणून संधी देण्यात आली आहे. त्यामुळे यशस्वी बॅकअप असूनही इतका वेळ सराव का करत होता? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. तसेच यशस्वीला संधी दिली जाऊ शकते. त्या अनुषंगाने यशस्वीने सराव केला असावा, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.
रोहितसाठी धोक्याची घंटाआता यशस्वीने केलेला सराव रोहितसाठी धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं जात आहे. रोहितला पहिल्या सामन्यात दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे जर रोहित दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही अपयशी ठरला तर त्याच्या जागी तिसऱ्या सामन्यात यशस्वीला संधी दिली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होतो. यशस्वीला केवळ एकमेव एकदिवसीय सामन्याचा अनुभव आहे. त्यामुळे रोहितला वगळून यशस्वीला संधी मिळण्याची संधी फार कमी आहे.
तसेच रोहित कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. रोहित एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्याच्या जागी ओपनर म्हणून यशस्वीच प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे हेड कोच गौतम गंभीर त्या अनुषंगाने आतापासूनच यशस्वीकडून तयारी करुन घेतोय का? असाही प्रश्न उपस्थित होतो.
हिटमनॅची आकडेवारीरोहितसाठी चिंताजनक बाब म्हणजे त्याचे एडलेड ओव्हलमधील आकडे काही खास नाही. दुसरा सामना हा या एडलेड ओव्हलमध्ये होणार आहे. रोहितने या मैदानात एकूण 6 सामने खेळले आहेत. रोहितने या 6 सामन्यांमध्ये 21.38 च्या सरासरीने आणि 73.18 च्या स्ट्राईक रेटने एकूण 131 धावा केल्या आहेत. रोहितला या मैदानात एकदाही अर्धशतक करता आलेलं नाही. रोहितची या मैदानातील 43 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यामुळे रोहित आता 23 ऑक्टोबरला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कमबॅक करत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.