महिला वसतिगृहाला वॉशिंग मशीनची दिवाळी भेट
प्रभादेवी, ता. २१ : दिवाळीच्या निमित्ताने राजस्थानी महिला मंडळाने एसएनडीटी महिला वसतिगृहाला वॉशिंग मशीनची अनोखी दिवाळी भेट दिली आहे. या वॉशिंग मशीन रूमचे उद्घाटन एसएनडीटीच्या उपकुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.
भारतातील विविध ठिकाणांहून एसएनडीटी महाविद्यालयात मुली शिकायला येतात. त्यांना उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे काम एसएनडीटी महाविद्यालय नेहमीच करत असते. या कामात राजस्थानी महिला मंडळासारख्या अनेक संस्था त्यांना उत्स्फूर्तपणे मदत करतात, असे डॉ. उज्वला चक्रदेव यांनी सांगितले. समाजातील वंचित आणि गरजू घटकांसाठी शिक्षण, आरोग्यसेवा देऊन त्यांना सशक्त करण्याचे आमचा प्रयत्न असल्याचे राजस्थानी महिला मंडळाच्या विश्वस्त उर्मिला रुंगटा यांनी सांगितले. या कार्यक्रमाला वसतिगृहाच्या प्रमुख डॉ. संतोषी पोटे, मुदिता जठिया, अर्चना बजाज, सौख्यम फाउंडेशनतर्फे प्रगती सिंग आदींची उपस्थिती होती.