Mira Road Clash : मीरारोडमध्ये दोन गटात तुफान हाणामारी; २० रिक्षांची केली तोडफोड, मुलीच्या छेडछाडीवरून झाला वाद
esakal October 22, 2025 08:45 PM

मीरारोडमध्ये मुलीच्या छेडछाडीवरून मोठा वाद झाला आहे. यावेळी दोन गटात तुफान हाणामारी झाली असून २० रिक्षांची तोडफोड करण्यात आली आहे. काशिमीरा परिसरातील डाचकुल पाडामध्ये पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून उपद्रव माजवण्याऱ्यांना अटक करण्यास सुरुवात केली आहे. मुलीच्या छेडछाडीतून हा वाद झाल्याचं समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काशीमिरा परिसरातील डाचकुल पाडा भागात रात्री दोन गटांमध्ये वाद झाला. मुलीची छेड काढण्यावर हा वाद झाला. त्यानंतर काहींनी मध्यस्थी करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर पहाटे काही जणांनी या ठिकाणी येत रिक्षांची तोडफोड केली. यात २० पेक्षा जास्त रिक्षांचं नुकसान झालं. महत्त्वाचे म्हणजे यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Mumbai Fire: दिवाळी सणाच्या ६० तासांत मुंबईत आगीच्या ५० घटना; कफ परेड येथील आगीत १६ वर्षाच्या मुलाने गमावले प्राण

प्रत्यक्षदर्शींने दिलेल्या माहितीनुसार पहाटे काही जण हातात दांडके, लोखंडी सळया आणि दगड घेऊन आले होते. त्यांनी या भागात उभ्या असलेल्या रिक्षांच्या काचा फोडल्या आणि घटनास्थळावरून पसार झाले. याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या या भागात तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर आता स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबईचा बंगाल होऊ देणार नाही ; मंगल प्रभात लोढा यांचा इशारा

दरम्यान, पोलिसंनी घटनेची दखल या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच उपद्रव माजविणाऱ्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु असून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही घटनास्थळी पोहचून नागरिकांची संवाद साधला. तसेच दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.