कासा, ता. २१ (बातमीदार) : दिवाळीचा सण सुरू होताच डहाणू तालुक्यातील बाजारपेठा झेंडूच्या फुलांनी उजळल्या आहेत. बलिप्रतिपदा, तसेच घराच्या सजावटीसाठी झेंडूच्या तोरणांना मोठी मागणी वाढली असून, बाजारपेठांमध्ये फुलांची रंगीबेरंगी झळाळी पाहायला मिळत आहे, मात्र यंदा सततच्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील स्थानिक फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
डहाणू, कासा, तलासरी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी झेंडू, मोगरा, सूर्यफूल आणि लिली यांची लागवड केली होती, परंतु अतिवृष्टीमुळे झेंडूची रोपे पाण्यात बुडाली. फुले पिवळी पडून गळाली आणि पिके कुजून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आंबेदा येथील शेतकरी कल्पेश पाटील सांगतात, यावर्षी झेंडू शेतीतून चांगला नफा मिळेल, अशी अपेक्षा होती, पण पावसामुळे संपूर्ण पीक पाण्यात पडले, फुले कुजली आणि संपूर्ण मेहनत वाया गेली. आता उत्पादन जवळजवळ शून्य आहे.
स्थानिक उत्पादन घटल्यामुळे बाजारपेठा आता बाहेरील जिल्ह्यांवर अवलंबून आहेत. नाशिक, मालेगाव, नांदेड, गोंदिया, तसेच गुजरातमधील भागातून झेंडूची आवक होत आहे. वाहतूक आणि खरेदी खर्च वाढल्याने फुलांच्या दरात चांगलाच वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
कासा येथील फुलविक्रेते कुणाल पाटील म्हणाले, दरवर्षी आम्ही स्थानिक शेतकऱ्यांकडून झेंडू घेतो. पण यंदा उत्पादन घटल्याने बाहेरील जिल्ह्यांतून फुले मागवावी लागली. त्यामुळे प्रतिकिलो झेंडू १०० ते १२० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. तरीही दिवाळीच्या आनंदात लोक फुले विकत घेण्यासाठी उत्सुक आहेत.
यंदा लाल आणि पिवळ्या झेंडूबरोबरच धरण-धामणी परिसरातील स्थानिक कमळफुलेदेखील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कमळफुले २० ते ३० रुपये भावाने विकली जात असून, पूजा-अर्चेसाठी त्यांची मागणीही वाढली आहे.