Kanakavli Accident : लग्नाची पत्रिका देऊन परतताना काळाचा घाला! अपघातात वाग्दत्त वधूचा जागीच मृत्यू; भावासमोरच बहिणीनं सोडला प्राण
esakal October 22, 2025 11:45 AM

कणकवली : स्वतःच्या विवाहाची पत्रिका नातेवाइकांना देऊन पुन्हा आपल्या गावी परत येत असताना तरुणीचा दुचाकी अपघातात (Kanakavli Accident) मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. १९) सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान कणकवली-आंब्रड बाजार मार्गावरील (Sindhudurg News) कसवण-तळवडे बौद्धवाडी येथे घडली. निकिता दिलीप सावंत (वय २८, रा. फोंडाघाट-गांगोवाडी) असे तिचे नाव आहे. अपघातात तिचा भाऊ वैभव किरकोळ जखमी झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : मूळ फोंडाघाट-गांगोवाडी येथील निकिता सावंत नोकरीनिमित्त मुंबईला असते. तिचा ३ फेब्रुवारीला विवाह निश्चित झाला होता. त्याचे निमंत्रण देण्यासाठी निकिता भाऊ वैभव याच्यासमवेत दुचाकी (एमएच 0७ एआर ९२४७) वरून आपल्या मामाकडे आंब्रड येथे गेली होती. तेथून दोघेही फोंडाघाट येथे निघाले होते.

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कणकवली ते आंब्रड बाजार अशी एसटी बस (एमएच १४ बीटी १४०१) जात असताना, कसवण-तळवडे बौद्धवाडी येथील उतारावर दुचाकीस्वार वैभव याने एसटीला बाजू देण्यासाठी दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेतली. मात्र, तेथील खडीवरून दुचाकी घसरली. यात दुचाकीवरील दोघेही रस्त्यालगतच्या भागात कोसळले. यात निकिता सावंत हिच्या डोक्याला मार बसला. वैभवदेखील जखमी झाला.

Heart Attack Case : महाकाल मंदिरात भस्मआरतीदरम्यान भक्ताचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; WhatsApp स्टेट्सवर लिहिलं होतं, 'आयुष्य क्षणभंगुर आहे...'

रस्त्यालगत दुचाकी आणि त्यावरील दोघे कोसळल्याचे लक्षात येताच बसचालक कृष्णा नेरकर यांच्यासह वाहक आणि अन्य प्रवाशांनी दोन्ही जखमींना बसमध्ये आणले आणि आंब्रडे येथील डॉ. खटावकर यांच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून खासगी वाहनाने दोघांना कणकवलीत आणण्यात आले. निकिता जास्त जखमी असल्याने तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला उपजिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

अपघातप्रकरणी एसटी बसचालक कृष्णा चंद्रकांत नेरकर (४६, रा. कणकवली) यांनी आज येथील पोलिस ठाण्यात वर्दी दिली. त्यानुसार दुचाकीस्वार वैभव दिलीप सावंत (वय ३५, रा. फोंडाघाट) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र नानचे तपास करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.