पुणे, ता. २१ : स्व. रामचंद्र वासुदेव देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या मुलीने स्वतःचे नाव जाहीर न करता ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या सामाजिक उपक्रमांना एक लाख रुपयांची देणगी दिली आहे.
नाशिकमधील सिन्नर येथे ५ मे १९२५ रोजी जन्माला आलेले रामचंद्र देशपांडे यांनी १९४६ मध्ये मुंबई विद्यापीठातून मराठी विषयात विशेष प्रावीण्य मिळविले. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी कबड्डी, खो-खो आणि बॅडमिंटन या खेळांमध्ये अनेक पारितोषिके मिळवली होती. जून १९४६ ते मे १९८३ या कालावधीत मुद्रांक शुल्क नोंदणी महानिरीक्षक विभागात देशपांडे रुजू झाल्यापासून निवृत्तीपर्यंत अधिकारी म्हणून कार्यरत होते. याकाळात रजिस्ट्रेशन व ‘बॉम्बे स्टॅम्प अॅक्ट’मध्ये वेळोवेळी सूचना करून कायदा सुधारणासंदर्भात त्यांचा सहभाग लक्षणीय होता. निवृत्तीनंतरही नवोदित ‘आयएएस’ अधिकाऱ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिले. शेवटच्या काळात कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी ते शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले.
त्यांना आदरांजली म्हणून त्यांच्या मुलीने ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या माध्यमातून ग्रामीण व आदिवासी भागातील शाळा स्तरांवर राबविण्यात येणाऱ्या डिजिटल क्लासरूम प्रकल्प आणि सायकल बँक उपक्रमांसाठी देणगी दिली आहे.