रीना भुतडा - करिअर समुपदेशक
सध्याच्या वेगवान, स्पर्धात्मक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात केवळ शैक्षणिक पदवी मिळवणे पुरेसे होत नाही. पदवी करिअर घडवण्याची सुरुवात असली तरी त्यासोबत आवश्यक कौशल्यांची जोड नसल्यास रोजगाराच्या संधी मर्यादित राहतात. नोकरी देणाऱ्या संस्था केवळ प्रमाणपत्रे पाहत नाहीत, तर उमेदवाराच्या कौशल्यांकडे, समस्यांचा सामना करण्याच्या क्षमतेकडे व संवाद कौशल्यांकडे अधिक लक्ष देतात.
कौशल्यांचे महत्त्व
पदवी ही शैक्षणिक पात्रतेचा पुरावा असतो, परंतु प्रत्यक्ष कामाच्या क्षेत्रात व्यक्ती किती कुशल आहे, यावर त्याच्या यशाची दिशा ठरते. एकच पदवी असलेल्या अनेक उमेदवारांमध्ये स्पर्धा असते, तेव्हा ज्याच्याकडे कौशल्यांचा ठसा उमटवणारी क्षमता असते, त्यालाच संधी मिळते. त्यामुळे कौशल्यविकास ही काळाची गरज आहे.
हार्ड स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स यांचे संतुलन
कौशल्यांच्या दोन महत्त्वाच्या गटांमध्ये तांत्रिक ज्ञान म्हणजे ‘हार्ड स्किल्स’ आणि व्यक्तिमत्त्व घडवणारी ‘सॉफ्ट स्किल्स’ येतात. संगणकाचे ज्ञान, तांत्रिक प्रावीण्य, विशिष्ट क्षेत्रातील तज्ज्ञता ही ‘हार्ड स्किल्स’ तर संवाद कौशल्य, नेतृत्वगुण, संघात काम करण्याची वृत्ती, समस्या सोडविण्याची क्षमता ही ‘सॉफ्ट स्किल्स’ आहेत. करिअरमध्ये दीर्घकालीन यश मिळवण्यासाठी या दोन्हींचा समतोल राखणे आवश्यक आहे.
व्यावहारिक अनुभवाचे महत्त्व
इंटर्नशिप, विविध प्रकल्पांमध्ये सहभाग, स्वयंसेवा, कार्यशाळा या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ सिद्धांत नव्हे तर प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो. उद्योग क्षेत्रात नेमके कसे कार्य केले जाते याची ओळख विद्यार्थ्यांना होते. अशा व्यावहारिक अनुभवामुळे आत्मविश्वास वाढतो, समस्यांचे नवे उपाय शोधण्याची क्षमता निर्माण होते आणि रोजगाराच्या संधी अधिक खुल्या होतात.
आवश्यक कौशल्ये
सध्याच्या काळात रोजगार बाजारपेठेत नवनवीन कौशल्यांची मागणी वाढत आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचे ज्ञान, डेटा विश्लेषण, कृत्रिम बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन, सर्जनशीलता, निर्णयक्षमता या सर्व गोष्टींचा नोकरी मिळवण्यासाठी महत्त्वाचा वाटा आहे. कंपन्या चांगल्या शैक्षणिक कामगिरी सोबतच इंटर्नशिप व प्रोजेक्टमधील कामगिरी, सर्टिफिकेशन्स, सॉफ्ट स्किल्स व संघात मिसळून काम करणारे उमेदवार शोधतात.
ऑनलाइन कोर्सेस व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा उपयोग
सध्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन कोर्सेस एनपीटीएल, एनएसडीसी, कोर्सेरा, युडेमी, स्वयम, इडीएक्स इत्यादी, वर्कशॉप्स आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या माध्यमातून कोणताही विद्यार्थी किंवा तरुण आपल्या क्षेत्रातील कौशल्ये सहज विकसित करू शकतो. घरबसल्या नवनवीन विषय शिकणे, नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे आणि त्याचा वापर प्रत्यक्ष कामात करणे हे अधिक सोपे झाले आहे. या अतिरिक्त अभ्यासक्रमांमुळे उमेदवाराच्या रेझ्युमेला अधिक वजन मिळते.
आत्मपरीक्षण आणि सतत शिकणे
कौशल्य विकासासाठी आत्मपरीक्षण आवश्यक आहे. आपली ताकद व कमतरता सुधारण्याच्या गरजा ओळखणे महत्त्वाचे असते. सतत शिकण्याची वृत्ती ठेवणाऱ्यालाच बदलत्या काळानुसार कौशल्ये आत्मसात करून करिअरमध्ये प्रगती करता येते.
निष्कर्ष
शैक्षणिक पदवी ही करिअरच्या पायाभूत टप्प्याची नोंद असते, मात्र ती एकटी पुरेशी नसते. कौशल्यांची जाणीवपूर्वक जोपासना, व्यावहारिक अनुभव, सॉफ्ट स्किल्स आणि तांत्रिक ज्ञान यांचा संगम, तसेच सतत शिकत राहण्याची वृत्ती यामुळेच खरे यश मिळते. म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याने पदवीसोबत कौशल्यांचा ठेवा जपणे आणि वाढवणे आजच्या काळाची गरज आहे.