ENGW vs AUSW: इंग्लंडचं ऑस्ट्रेलियासमोर 245 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?
GH News October 22, 2025 10:12 PM

वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने आले आहे. या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत आपलं स्थान आधीच निश्चित केलं आहे. तसेच एकही सामना गमावलेला नाही. दोघांचा प्रत्येक एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे या सामन्यात विजयी संघाची थेट पहिल्या स्थानावर वर्णी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने या सामन्यात 50 षटकात 9 गडी गमवून 244 धावा केल्या. तसेच विजयासाठी 245 धावांचं आव्हान दिलं आहे. इंग्लंडने या सामन्यात सावध सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. पण एमी जोन्स 18 धावा करून बाद झाली आणि इंग्लंडला पहिला धक्का बसला.

हिथर नाईट आणि टॅमी ब्यूमोंट यांच्या दुसऱ्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी झाली. हीथर नाईट 20 धावा करून बाद झाली. त्यानंतर नॅट सायव्हर ब्रंट देखील काही खास करू शकली नाही. अवघ्या 7 धावा करून बाद झाली. टॅमी ब्यूमोंटने एका बाजूने खिंड लढवली. पण 78 धावांवर बाद झाली आणि इंग्लंडचा डाव गडगडला. सोफिया डंकले 22 धावा, एम्पा लँब 7 धावा, एलिस कॅप्सी 38 धावा, शार्लोन डीन 26 धावा आणि लिन्सी 3 धावा करून बाद झाले. सोफी एक्सलटन नाबाद 10 आणि लॉरेन बेल नाबाद 2 धावांवर राहिली. ऑस्ट्रेलिायकडून एनाबेल सदरलँडने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. 10 षटकात 60 धावा देत तिने तीन विकेट काढल्या. तर सोफी मोलिनेक्सने 2, एलाना किंगने 1 आणि एशले गार्डनरने 2 विकेट काढल्या.

ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड या दोन्ही संघांना टॉप राहण्याची मोठी संधी आहे. टॉपला म्हणजेच पहिल्या स्थानावर असलेल्या संघाचा सामना चौथ्या क्रमांकाच्या संघाशी होतो. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या भाषेत सांगायचं तर पहिलं स्थान परवडतं. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानात उपांत्य फेरीचा सामना होतो. त्यामुळे आता कोणता संघ कोणाशी भिडणार हे या सामन्यानंतर जवळपास स्पष्ट होईल. आता ऑस्ट्रेलियाचे फलंदाज कशी कामगिरी करतात आणि इंग्लंडचा भेदक मारा मोडून काढतात का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.