सध्या देशात बिहार निवडणुकीची धूम पहायला मिळत आहे, बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर झाली असून, प्रचाराला देखील वेग आला आहे. दरम्यान बिहारमध्ये काँग्रेसने आरजेडीसोबत युती केली आहे. तर दुसरीकडे एमआयएम सोबत देखील युतीची चर्चा सुरू आहे. यावर आता एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यासाठी भाजप आहे तेच काँग्रेस आणि आरजेडी आहे. पाच जागा जिंकणारे आम्ही त्यांना फक्त सहा जागा मागत आहोत, मात्र त्या जागाही ते आम्हाला देत नाहीत. तेजस्वी यादव म्हणतात भाजपचा पराभव करायचे असेल तर एमआयएमने निवडणूक लढवू नये, मग आम्ही काय गोट्या खेळायच्या का? असा थेट सवाल जलील यांनी काँग्रेस आणि आरजेडीला केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आज मुंबई वगळता इतर जिल्ह्यातल्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. आम्ही आगामी सर्व निवडणूक लढणार आहोत, त्यानुसार सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. आमच्या महाराष्ट्र टीमने आज आढावा घेतला आहे, त्यानुसार कुठे किती जागा लढवायच्या? याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. तर आगामी निवडणुकीमध्ये कोणासोबत युती करावी? याचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील. आम्ही ज्यांना उमेदवारी देणार अहोत, तिथे जर दारुण पराभव झाला तर तेथील जबाबदार व्यक्तीला घरचा रस्ता दाखवला जाणार आहे, असंही यावेळी जलील यांनी म्हटलं आहे. आमच्यासोबत युती करावी अशी कुणाची इच्छा असेल, असे मला वाटत नाही, असंही यावेळी जलील यांनी म्हटलं .
दरम्यान शनिवार वाड्यात नमाज पठणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यावरून जोरदार राडा झाला, यावर देखील जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोहोळ यांच्याविरोधातील घोटाळा समोर आला असल्याने सर्वांचे लक्ष विचलित करण्यासाठी शनिवार वाडा प्रकरण समोर आलं आहे. नमाजाची वेळ झाल्याने त्यांनी नमाज पठण केल असेल तर काय झालं? त्यांनी दगडाला कलर मारून शनिवारवाडा आमचा असल्याचं म्हटलं होतं का? भाजपच्या दबावाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मस्तानीने किती वेळा त्यावेळी तिथे नमाज पठण केलं असेल? कोणाल माहीत अशी प्रतिक्रिया यावर जलील यांनी दिली आहे.