Sangli Jat Police : 'जत नाही बिहार!' सांगलीत पोलिस पथकावर हल्ला; तब्बल ४० जणांवर गुन्हा दाखल
esakal October 22, 2025 10:45 PM

Sangli Jat Crime News : जत शहरात मध्यवर्ती पारधी तांडा येथील एका गुन्ह्यातील संशयित आरोपी धनंजय दीपक चव्हाण याला ताब्यात घेताना पोलिसांना धक्काबुक्की करत पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केल्याचा प्रकार घडला. मंगळवारी (ता. २१) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत जत पोलिसांत पोलिस हेडकॉन्स्टेबल अच्युतराव विनायक माने यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी बसवराज चव्हाण, राकेश अप्पू काळे, विशाल राजेश काळे, दीपक चव्हाण, कोमल दीपक चव्हाण, दीपा हनुमंत काळे, जिजाबाई रामचंद्र चव्हाण, अपर्णा धनंजय चव्हाण, विद्या दीपक चव्हाण (सर्व रा. पारधी तांडा, जत शहर) यांच्यासह ३० ते ४० अनोळखी महिला व पुरुष यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दीपावलीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात ‘नाका बंदी’, ‘ऑल आऊट’ आणि ‘कोम्बिंग’ ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. त्यानुसार जत पोलिस पथक मधला पारधी तांडा येथे गुन्ह्यात पाहिजे असलेल्या संशयिताचा शोध घेत होते. यादरम्यान एका गुन्ह्यात पाहिजे असलेला संशयित धनंजय दीपक चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

मात्र, त्याला घेऊन जात असताना त्याचे वडील दीपक चव्हाण यांनी आरडाओरड करून जमाव जमवला आणि पोलिस कारवाईला विरोध केला. काहींनी पोलिस पथकाला घेरले, धक्काबुक्की केली आणि ‘पोलिसांना बघून घेतो’ अशा धमक्या दिल्या. यावेळी जिजाबाई चव्हाण हिने अंमलदार अच्युतराव माने यांना हाताने आणि बुक्याने मारहाण केली. तसेच राकेश अप्पू काळे आणि विशाल राजेश काळे यांनी शासकीय वाहनावर (एमएच १०, ईई २४२३) दगडफेक करून समोरील काच व बाजूचे साईड मिरर फोडले.

Kolhapur Buffalo Road Show : कोल्हापुरात अनोखा रोड शो, Yamaha च्या मागे म्हशी पळवण्याची परंपरा; नटलेल्या म्हशी बघून तुम्हीही म्हणाल, 'सुंदरी सुदंरी...'

याप्रकरणी, सरकारी कामात अडथळा आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे आरोपींनी उघड उल्लंघन केले. जमावाने पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा आणून दमदाटी केली आणि ताब्यातील आरोपीला सोडवण्याचा प्रयत्न केल्याने जत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास जत पोलिस करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.