Diwali 2025: आज पाडवा आणि गोवर्धन पूजा, उद्या भाऊबीज; चुकवू नका महत्त्वाचे मुहूर्त
esakal October 22, 2025 10:45 PM

Padwa And Govardhan Pooja 2025: आजच्या दिवशी नवीन कार्यारंभ, खरेदी व कौटुंबिक स्नेह वाढण्यासाठीचा शुभ मुहूर्त आहे. शहरातील मधला मारुती, बुधवार बाजार, जोडवसवण्णा चौक, जुळे सोलापुरातील बाजारपेठा वही व पूजा साहित्य, दुचाकी, चारचाकी खरेदीसाठी गर्दीन गजबजल्या आहेत.

अनेकांच्या घरांचे स्वप्नदेखील आजच्या मुहूर्तावर पूर्ण होणार आहे. त्यासाठी विविध विकसकांची कार्यालये देखील नागरिकांच्या गर्दीन फुलल्याचे दिसत आहे.

असा साजरा करा घरात पाडवा

पाटाभोवती रांगोळी काढून पत्नीने पतीचे औक्षण करावे. पतीने पत्नीला भेटवस्तू स्वरूपात ओवाळणी द्यावी. विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभया दिवशी होतो. उज्जैनचा राजा विक्रमादित्य याने शकांचे आक्रमण मोडून त्यांचा पाडाव केला. त्या विजयाचे प्रतीक म्हणून विक्रमादित्याने विक्रमसंवत ही कालगणना सुरू केली.

आजच्या दिवशी सत्त्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला विष्णुदेवांनी पाताळ लोकांचे राज्य बहाल करून कार्तिक प्रतिपदेला लोक बळीराजाच्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील, असे वरदान दिले. या दिवशी संकट टळून बळीराजाचे म्हणजे कष्टकऱ्यांचे राज्य येऊ दे अशी प्रार्थना करावी.

गुरुवारी बहीण भावांच्या नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज सण साजरा करण्यात येणार आहे. या दिवसाला यमद्वितीया असेही म्हटले जाते. दिवाळी सणातील शेवटचा महत्त्वाचा सण. नेपाळमध्ये हा सण भाईतिहार म्हणून साजरा करण्यात येतो.

आजच्या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी भोजनास गेला होता, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असेही म्हटले जाते. गुरुवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी अनेक ठिकाणी दीपोत्सवाने उत्सवाची सांगता करण्यात येते.

गोवर्धन पूजा व अन्नकूट उत्सव

घरासमोर गायीच्या शेणापासून गोवर्धन पर्वताची प्रतिकृती तयार करावी. त्यावर हळद कुंकू वाहून त्यावर फुले वाहून त्याचे पूजन करावे.

विविध प्रकारच्या भाज्या, डाळी, भात, मिठाई, फळे यांचा छप्पन भोग हा नैवेद्य भगवान श्रीकृष्णांना दाखवून त्याचे वाटप करावा. अशाप्रकारे गोवर्धन पूजा करुन व अन्नकूट उत्सव साजरा करावा. मुहूर्त सकाळी ६.२६ ते ८.४२ दुपारी ३.२९ ते सायंकाळी ५.४४

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.