आयपीएल 2026 स्पर्धेसाठी सर्वच संघांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. मिनी लिलावापूर्वी कोणते प्लेयर्स ठेवायचे आणि कोणते काढायचे यावर खलबतं सुरु आहेत. तसेच ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडूंबाबत बोलणीही सुरु आहेत. मिनी लिलाव डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. त्यामुळे सर्वच संघांना 15 नोव्हेंबरपर्यंत राखून ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. यावेळी सर्वांच्या नजरा या मुंबई इंडियन्स संघावर खिळल्या आहेत. कारण पाचवेळा जेतेपदाची चव चाखलेल्या मुंबई इंडियन्सला मागची पाच वर्षे काही खास गेली नाही. त्यामुळे 2026 स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात सहाव्यांदा जेतेपद मिळवण्यासाठी खेळाडूंची जुळवाजुळव करण्याची धडपड सुरु झाली आहे. मागच्या पर्वात मुंबईने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते. पण एलिमिनेटर फेरीत गुजरातकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे मिनी लिलावापूर्वी संघात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. खासकरून पाच खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
अफगाणिस्तानचा लेगस्पिनर गझनफर याला मिनी लिलावापूर्वी रिलीज केलं जाण्याची शक्यता आहे. कारण आयपीएल 2025 स्पर्धेत एकही सामना खेळला नाही. त्याच्यासाठी फ्रेंचायझीने 4.8 कोटी मोजले होते. मिशेल सँटनर संघात असल्याने त्याला संधी मिळाली आहे. त्यात अलिकडे खेळलेल्या स्पर्धांमध्ये त्याची कामगिरी काही विशेष नव्हती. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रीस टॉपली यालाही रिलीज केलं जाण्याची शक्यता आहे. मागच्या पर्वात एकच सामना खेळला होता. त्याच्यासाठी फ्रेंचायझीने 75 लाख मोजले होते.
दीपक चहरचं नावही या यादीत असण्याची शक्यता आहे. कारण मेगा लिलावात त्याच्यासाठी मुंबईने 9.25 कोटी मोजले होते. पण त्याची कामगिरी काही खास राहिली नाही. त्याने 14 सामन्यात फक्त 11 विकेट घेतले. संघात ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह असताना इतर स्वस्त आणि मस्त पर्याय शोधला जाण्याची शक्यता आहे. दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लिझाड विल्यम्स यालाही रिलीज केलं जाऊ शकते. त्याने मागच्या पर्वात एकही सामना खेळला नाही. फक्त नेट प्रॅक्टिसमध्ये वेळ घालवला. त्यासाठी फ्रेंचायझीने 75 लाख मोजले होते.