Satara: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसासह एका व्यक्तीविरोधात गुन्हा
Saam TV October 24, 2025 10:45 PM
अक्षय बडवे, पुणे

सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एका पोलिस अधिकाऱ्यावर आणि एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची साम टीव्हीला माहिती दिली. या प्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील एक व्यक्ती पोलिस उपनिरीक्षक आहे. दुसरा व्यक्ती पोलिस विभागातील नसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात ज्या पोलिसांवर आरोप आहेत ते दोघेही फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. ते सध्या फरार आहेत.

फलटणमधील महिला डॉक्टर संपदा मुंडेने गुरूवारी हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी संपदा मुंडे यांनी हातावर सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये त्यांनी दोन पोलिसांनी माझा बलात्कार, मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप केला. या घटनेमुळे सध्या साताऱ्यात खळबळ उडाली आहे. या दोन्ही पोलिसांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या घटनेच्या चौकशीचे देखील आदेश देण्यात आले आहेत.

सातऱ्यातील या घटनेमुळे राजकारण देखील चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुष्मा अंधारे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'फलटणमध्ये एका डॉक्टर महिलेने केलेली आत्महत्या ही नुसती दुर्दैवी नाही. तर अत्यंत चिंतनिय बाब आहे. कामाच्या ठिकाणी शासकीय स्तरावर महिलांचा अशा पद्धतीने त्यांना मेंटली टॉर्चर होणार या संबंधाने खरंतर पूर्व प्रतिबंधात्मक कायदे अधिक कठोर करण्याची गरज आहे. प्रश्न फक्त बदने किंवा बनकर सारख्या पोलिस अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचा नाहीये. मुळात हे सगळी घटना चालू असताना त्या तीन महिन्यांच्या काळामध्ये संबंधित महिलेने काय वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली होती का? वरिष्ठांकडून त्याची दखल घेतली गेली का? या महिलेला कुठूनही मदत मिळाली नाही. काम कायदा सुव्यवस्थेची बुज राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे . जे कायद्याचे रक्षक आहेत. तेच जर भक्षक होणार असतील तर दाद कुणाकडे मागायची.

सुषमा अंधारे यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या की, 'मुद्दा एकट्या डॉक्टर महिलेचा नाही. पुण्यामधल्या एका पोलिस अधिकारी महिलेच्या संदर्भात भाजप पदाधिकारी प्रमोद कोंडरेच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. परंतु पोलिस अधिकारी महिलेने स्वतःसाठी स्वतः घेतलेला स्टॅन्ड हा आयुक्त अमितेश कुमार यांना किती पटला कारण जबरदस्तीने या महिला पोलिस अधिकाऱ्यांची नंतर बदली करण्यात आली. जर महिलांना सुरक्षितपणे काम करता येत नसेल तर तुमच्या नुसत्या लाडक्या बहिणीच्या पोस्टरबाजीने काय होईल हा खरा चिंतनाचा मुद्दा आहे. आमची विनंती आहे. की फक्त बदने, बनकर सारख्या पोलिस अधिकाऱ्यांवर नुसती कारवाई करून चालणार नाही तर सरांडिंग असणाऱ्या इतर अनेक या घटक यंत्रणा आहे त्यांची सुद्धा स्वतंत्रपणे चौकशी झाली पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे.'

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.