साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. काल रात्री शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने केवळ वैद्यकीय क्षेत्र नव्हे तर संपूर्ण जिल्हा पोलीस दल हादरले आहे. कारण, मृत डॉ. संपदा मुंडे यांनी हातावर एक सुसाईड नोट लिहिली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. मात्र त्यातील दोन शब्दांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी तिच्या हातावर पेनाने सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी त्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावे स्पष्टपणे नमूद केली आहेत. माझ्या मरणास पोलीस निरीक्षक गोपाल बदने जबाबदार आहे, ज्याने ४ वेळा माझ्यावर अत्याचार केले. तसेच, पोलीस प्रशांत बनकर यानेही मागच्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला. असा संपदा मुंडे यांनी हातावर लिहिले आहे. यात त्यांनी वापरलेला अत्याचार आणि छळ या दोन शब्दांनी महाराष्ट्र हादरला आहे.
वडिलांचा आरोप काय?या घटनेनंतर डॉ. संपदा मुंडे यांच्या वडिलांनीही गंभीर आरोप केले आहेत. माझ्या मुलीला वारंवार पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून द्या असा त्रास दिला जायचा. मला जर त्रास झाला तर आत्महत्या करेन, असे ती अधूनमधून सांगायची. तिने याबद्दल लेखी तक्रारही दिली होती. पण तिचे उत्तर आले नव्हते, असे तिच्या वडिलांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या रिपोर्ट बदलून देण्याच्या दबावाला ती सहन करू शकत नव्हती, ज्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप वडिलांनी केला आहे.
प्रकरणाचा तातडीने तपास सुरूदरम्यान या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी याप्रकरणी जबाबदार असलेल्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येमुळे फलटण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर आरोपांवर पोलीस आता कोणती कठोर कारवाई करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू केला आहे.
याप्रकरणी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सातारा पोलिस अधिक्षक यांच्याशी फोनवरून चर्चा झाली असून तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. या घटनेत जो कोणी सहभागी असेल त्याच्यावर कारवाई होईल… जो अहवाल येईल त्यात ज्या कोणाचा सहभाग असेल कारवाई होईल, असे म्हटले.