पीएच्या फोनवरून खासदार बोलायचे, अन्… सातारा डॉक्टर प्रकरणात मोठा ट्विस्ट, कुटुंबीयांच्या दाव्याने खळबळ!
Tv9 Marathi October 24, 2025 10:45 PM

Satara Phaltan Doctor Death Case : साताऱ्यातील फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाल आहे. या डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या तळहातावर एक संदेश लिहिला असून यात तिने एका पोलीस अधिकाऱ्याने चार वेळा बलात्कार केल्याचा तसेच एका पोलीस अधिकाऱ्याने 4 महिन्यांपासून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे नेमूद केले आहे. या घटनेची दखल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी आरोप असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. दरम्यान, आता याच प्रकरणात आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेच्या भावाने खळबळ उडवून देणारे आरोप केले आहेत. त्यांनी पीएच्या फोनवरून एक खासदार बोलायचा, रिपोर्ट बदलायलास सांगायचा, असा धक्कादायक दावा केला आहे.

काहीतरी राजकीय दबाव असू शकतो

डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्यानंतर तिचे कुटुंबीय आता समोर आले आहेत. या डॉक्टरच्या कुटुंबीयांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना खळबळजनक आरोप केले आहेत. डॉक्टरच्या भावाने तर मोठा दावा केला आहे. “माझ्या बहिणीच्या आत्महत्येमागे काहीतरी राजकीय दबाव असण्याची शक्यता आहे. कारण माझ्या बहिणीच्या मृत्यू प्रकरणात एफआयआर दाखल करून घेण्यास पोलिसांनी चार ते पाच तास लावले. आता तीन ते साडे तान तास झालेले असले तरी शवविच्छेदनासाठी कोणताही डॉक्टर आलेला नाही,” असा आरोप डॉक्टरच्या भावाने केला आहे.

खासदार पीएच्या फोनवरून बोलायचे

तसेच, माझ्या बहिणीने काही अर्ज केले होते. त्या अर्जांची प्रत आम्हाला मिळालेली आहे. त्या तक्रारीत खासदारांच्या पीएच्या फोनवरून खासदार बोलले आणि शवविच्छेदनाचे चुकीचे रिपोर्ट तयार करण्यासाठी दबाव टाकला असा उल्लेख आहे. माझ्या बहिणीने केलेल्या तक्रारीत फक्त खासदार असा उल्लेख आहे. खासदाराच्या नावाचा उल्लेख नाही, असा मोठा आणि खळबळजनक दावा डॉक्टरच्या भावाने केला आहे. सोबतच त्या तक्रारीत पोलिसांची नावेही आहेत. महाडिक म्हणून कदाचित एसपी असावेत. गोपाल भरणे म्हणून पोलीस निरीक्षक आहेत. यात प्रशांत बनकर यांचेही नाव आहे. तिने केलेल्या तक्रारीत एकूण चार ते पाच पोलिसांची नावे आहेत,” अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

मुलीला त्रास देणाऱ्यास फाशीची शिक्षा द्या…

आमची दोन अडीच एक शेती आहेत. तिचं एवढं मोठं शिक्षण आम्ही केलं. तिला कोणत्या दुष्मनाने त्रास दिला, अशा भावना डॉक्टर महिलेच्या अन्य कुटुंबीयाने व्यक्त केला. तसेच ज्याने माझ्या लेकराला त्रास दिला, त्याला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणीही आहे, डॉक्टर महिलेच्या कुटुंबातील एका सदस्याने केला. त्यामुळे आता या प्रकरणात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरोप असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचा आदेश दिला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.