पालघर, ता. २१ (बातमीदार) : राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी व विशेष मदत पॅकेज जाहीर करावे. पालघर जिल्ह्यातील ९० टक्के भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्यांना अजूनही मदत मिळालेली नाही, या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी किसान काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे उद्या (ता. २२) पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाच्या उपोषणाला बसणार आहेत. राज्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे भीषण प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ, तसेच खानदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये व पालघर जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, मात्र आता दिवाळी संपत आली तरी अजूनही शेतकऱ्याला भरपाई मिळालेली नाही. आज शेतकऱ्याला काळी दिवाळी साजरी करावी लागते. अनेक शेतकरी आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलत आहेत, याकडे लक्ष वेधण्यासाठी उपोषणाला बसत आहे, असे त्यांनी सांगितले.