महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकारने पावले उचलावीत
मार्ड संघटनेची मागणी
मुंबई, ता. २१ : पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे २३ वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक अत्याचारानंतर महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. महाराष्ट्रातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालये तसेच मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने आणि ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन’ने (एफएआयएमए) राज्य व केंद्र सरकारकडे महिला डॉक्टरांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे.
मार्ड आणि एफएआयएमए यांचे म्हणणे आहे की, परदेशातील वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांप्रमाणे येथेही महिला निवासी डॉक्टरांना सुरक्षेचे ‘कवच’ मिळाले पाहिजे. निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे की, परदेशातील रुग्णालयांमध्ये रात्री अथवा वाहतूक होताना महिला डॉक्टरांसोबत सुरक्षा रक्षक असतो. मुंबई आणि राज्यातील रुग्णालयांमध्येही महिला डॉक्टरांना अशीच सुरक्षा पुरविणे आवश्यक आहे. सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. सचिन पाटील यांनी सांगितले की, रुग्णालयांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या अपुरी आहे, तर एफएआयएमएचे अध्यक्ष डॉ. अक्षय डोंगरदिवे यांनी म्हटले आहे की, रुग्णालयांमध्ये महिला डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी, कार्यालयीन महिला कर्मचारी आणि महिला रुग्ण यांच्या सुरक्षेची प्रभावी व्यवस्था केली पाहिजे.