काळेवाडी, ता. २१ : काळेवाडी ते चिंचवड गावाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याला दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालक आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेकडे त्वरित दिशादर्शक फलक लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड, वाकड आदी भागातून चिंचवडकडे जाणाऱ्यांसाठी काळेवाडी फाटा हा प्रमुख मार्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तीन दिशांना रस्ते फुटतात. एक रस्ता चिखली, स्पाइन रोड व ऑटो क्लस्टरकडे बीआरटीएस मार्गाने जातो, दुसरा रस्ता पाचपीर चौक मार्गे पिंपरीकडे जातो, तर तिसरा रस्ता डॉ. हेडगेवार पूल ओलांडून केशवनगर, चापेकर चौक, चिंचवडगाव, बिजलीनगर व आकुर्डीमार्गे रावेतकडे जातो. या प्रमुख मार्गावर चिंचवडकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक नसल्यामुळे अनेक वाहनचालक चुकीच्या दिशेने जातात आणि वाहतुकीत गोंधळ होतो. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सध्या केवळ हेडगेवार पुलाचा फलक आहे. त्यासोबतच चिंचवड, बिजलीनगर व रावेतच्या दिशेचा फलक लावल्यास नागरिकांना मोठी सोय होईल. तसेच, तापकीर चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दिशादर्शक व माहिती फलक बसवावेत, अशी मागणीही रहिवाशांकडून करण्यात आली आहे.