सुब्रमण्यम 'सुबु' वेदम हे हत्येच्या गुन्ह्यासाठी 43 वर्षे तुरुंगात होते. यातली भयंकर गोष्ट म्हणजे, हा गुन्हा केलेला नसतानाही त्यांना तुरुंगात राहावं लागलं.
अखेर आता त्यांची तुरुंगातून सुटका झाली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला नव्या पुराव्यांच्या आधारे सुब्रमण्यम यांची हत्येच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यांच्यावर त्यांच्या एका माजी रूममेटची हत्या केल्याचा आरोप होता.
मात्र, आता निर्दोष सुटल्यावर सुब्रमण्याम यांच्या कुटुंबानं त्यांची भेट घेण्याआधीच अमेरिकेच्या इमिग्रेशन आणि कस्टम्स एन्फोर्समेंट म्हणजे आयसीईनं त्यांना ताब्यात घेतलं आहे. कारण या यंत्रणेला सुब्रमण्यम यांची रवानगी भारतात करायची आहे.
मात्र, सुब्रमण्यम यांचं फक्त बालपण भारतात गेलं आहे आणि त्यानंतर ते भारतात राहिलेले नाहीत.
आता सुब्रमण्यम वेदम यांची कायदेशीर टीम अमेरिकेतून रवानगी करण्याच्या या आदेशाविरोधात लढा देते आहे. त्यांच्या कुटुंबाची इच्छा आहे की त्यांची कायमस्वरुपी सुटका करण्यात यावी.
त्यांची बहीण सरस्वती वेदम बीबीसी म्हणाल्या की, त्यांचं कुटुंब आता एका नव्या आणि 'अतिशय वेगळ्या' परिस्थितीवर मात करण्याचं प्रयत्न करतं आहे.
त्यांच्या भावाची तुरुंगातून सुटका झाली आहे, मात्र त्याला आता अशा ठिकाणी ताब्यात ठेवण्यात आलं आहे, जिथे तो कोणालाच ओळखत नाही. आधी सुब्रमण्यम ज्या तुरुंगात होते, तिथे कैदी आणि गार्ड त्यांना ओळखत होते.
ते तिथे कैद्यांचे मार्गदर्शक होते आणि त्यांची स्वत:ची कोठडी होती. आता ते 60 जणांसह एकाच खोलीत राहतात. तिथे चांगल्या वर्तनाची किंवा कामाची कोणालाही माहिती नाही.
या नव्या परिस्थितीत सुब्रमण्यम त्यांच्या बहिणीला आणि कुटुंबाला वारंवार एकच गोष्ट म्हणत होते, "आपण आपल्या जिंकण्यावर लक्ष दिलं पाहिजे."
ते म्हणाले, "मी आता निरपराध सिद्ध झालो आहे. मी आता कैदी नाही. मी आता एक ताब्यात घेण्यात आलेला व्यक्ती आहे."
1980 सालचं हत्येचं प्रकरण40 वर्षांपेक्षा अधिक काळापूर्वी सुब्रमण्यम वेदम यांना त्यांचे रूममेट टॉम किन्सर याच्या हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यावेळेस टॉम किन्सर हा 19 वर्षांचा महाविद्यालयीन विद्यार्थी होता.
किन्सरचा मृतदेह नऊ महिन्यांनी एका जंगलात सापडला होता. त्याच्या डोक्यावर गोळी झाडल्याच्या खुणा होत्या.
ज्या दिवशी किन्सर बेपत्ता झाला, त्याच दिवशी सुब्रमण्यम वेदम यांनी त्याच्याकडे लिफ्ट मागितली होती. किन्सरची गाडी नेहमीच्या ठिकाणावर सापडली. मात्र हे कोणीही पाहिलं नाही की ती परत कोणी आणली.
वेदम यांच्यावर किन्सर यांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यांना जामीन देण्यात आला नाही. अधिकाऱ्यांनी त्यांचा पासपोर्ट आणि ग्रीन कार्ड जप्त केलं. तसंच ते 'पळून जाणारा परदेशी असल्याचं', असं सांगण्यात आलं.
दोन वर्षांनी सुब्रमण्यम यांना हत्येच्या आरोपात दोषी ठरवण्यात आलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
1984 मध्ये त्यांना एका ड्रग प्रकरणातदेखील दोन वर्षे सहा महिने ते पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. ही शिक्षादेखील आधीच्या शिक्षेसोबत पूर्ण करायची होती. या सर्व कालावधीत वेदम यांनी हत्या केल्याचे आरोप नाकारले होते.
त्यांचे पाठिराखे आणि कुटुंबाचं म्हणणं होतं की ही हत्या त्यांनी केली आहे असा दाखवणारा कोणताही ठोस पुरावा नव्हता.
वेदम यांचं निरपराधपणा सिद्ध झालासुब्रमण्यम वेदम यांनी या हत्येच्या प्रकरणात वारंवार अपील केलं होतं. काही वर्षांपूर्वी या प्रकरणात नवीन पुरावे समोर आले. त्या पुराव्यांच्या आधारे वेदम यांची निर्दोष सुटका झाली.
याच महिन्याच्या सुरुवातीला सेंटर काउंटीचे डिस्ट्रिक्ट ॲटर्नी बर्नी कॅंटोर्ना म्हणाले की वेदम यांच्या विरोधात नवीन खटला चालवला जाणार नाही.
मात्र वेदम यांच्या कुटुंबाला माहित होतं की त्यांची सुटका होण्यास अद्याप आणखी एक समस्या आहे. ती म्हणजे 1988 मध्ये देण्यात आलेला अमेरिकेतून हकालपट्टी करण्याचा आदेश.
हत्या आणि ड्रग प्रकरणात वेदम यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर हा आदेश देण्यात आला होता.
वेदम यांच्या बहीण सरस्वती म्हणाल्या की कुटुंबाला आशा होती की इमिग्रेशन प्रकरणाची पुन्हा सुनावणी होण्यासाठी त्यांना अपील करावं लागेल. त्या म्हणाल्या की आता या प्रकरणातील पुरावे, परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे.
मात्र जेव्हा आयसीईनं सुब्रमण्यम यांना अटक केली, तेव्हा या यंत्रणेनं याच जुन्या हकालपट्टीच्या आदेशाचा संदर्भ देत सुब्रमण्यम यांना पेन्सिल्व्हेनियातील दुसऱ्या एका केंद्रात ताब्यात घेतलं होतं.
आयसीईचं म्हणणं आहे की, वेदम यांची हत्येच्या प्रकरणात निर्दोष सुटका झाली आहे. मात्र ड्रग प्रकरणातील त्यांचं निर्दोषत्व अद्याप सिद्ध झालेलं नाही. आयसीईनं म्हटलं की त्यांनी कायद्यानुसार कारवाई केली आहे.
आयसीईनं बीबीसीच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत. मात्र इतर अमेरिकन प्रसारमाध्यमांना सांगितलं की सुब्रमण्यम यांच्या हकालपट्टीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना ताब्यात ठेवलं जाईल.
सुब्रमण्यम वेदम यांच्या कुटुंबाचं म्हणणं आहे की सुब्रमण्यम यांच्या प्रकरणाचा तपास करताना इमिग्रेशन कोर्टानं तुरुंगातील त्यांचं चांगलं वर्तन, तीन पदव्या आणि त्यांची सामुदायिक सेवा लक्षात घेतली पाहिजे.
सुब्रमण्यम यांची बहीण सरस्वती म्हणाल्या, "सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे आम्हाला एका क्षणासाठीसुद्धा त्यांची गळाभेट घेता आली नाही. त्यांना चुकून अटक करण्यात आली होती. ते इतक्या सन्मानानं आणि प्रामाणिकपणे आयुष्य जगले आहेत. त्याला काहीतरी महत्त्व असलं पाहिजे."
भारतात पाठवलं जाण्याची शक्यतासुब्रमण्यम यांच्या कुटुंबाचं म्हणणं आहे की, भारताशी सुब्रमण्यम वेदम यांचे हीच संबंध उरले नाहीत.
सुब्रमण्यम यांचा जन्म भारतात झाला होता. मात्र, ते फक्त नऊ महिन्यांचे असतानाच कुटुंबीयांसोबत ते अमेरिकेत आले होते.
त्यांची बहीण सरस्वती यांच्या मते, भारतात त्यांचे जे थोडे नातेवाईक आहे, ते खूप लांबचे आहेत.
त्यांचं कुटुंबं आणि काही नातेवाईक अमेरिका आणि कॅनडात राहतात.
सरस्वती म्हणाल्या, "जर त्यांना भारतात पाठवण्यात आलं तर ते पुन्हा एकदा त्यांच्या सर्वात जवळच्या लोकांपासून दुरावतील. त्यांचं आयुष्य दोनदा हिरावून घेतल्यासारखं ते होईल."
सुब्रमण्यम वेदम अमेरिकेचे कायमस्वरूपी रहिवासी आहेत. त्यांना अटक होण्याआधीच त्यांच्या नागरिकत्वाचा अर्ज मंजूर झाला होता. त्यांचे आई-वडीलदेखील अमेरिकेचे नागरिक होते.
त्यांच्या वकील एवा बेनाच यांनी बीबीसीला सांगितलं, "आता जर त्यांना अमेरिकेतून पुन्हा अशा देशात पाठवण्यात आलं, ज्याच्याशी त्यांचा काहीही संबंध राहिलेला नाही, तर ज्या व्यक्तीनं त्याच्या आयुष्यात विक्रमी पातळीवरचा अन्याय सहन केला आहे, त्यांच्यावर पुन्हा एकदा मोठा अन्याय केल्यासारखं होईल."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)