हिवाळा सुरु होण्यास काही दिवस शिल्लक असले तरी गेल्या काही दिवसांपासून तापमानात सतत घट होताना दिसत आहे. हिवाळ्यात पाणी गरम करण्यासाठी गिझरची आवश्यकता असते.
जर तुम्हीही नवीन गिझर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि तुमच्या गरजेनुसार त्याची क्षमता किती असावी, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य क्षमतेचा गिझर निवडल्यास पाण्याची आणि विजेची बचत होते.
गिझर विविध आकारात, प्रकारात आणि बजेटमध्ये उपलब्ध आहेत लहान इन्स्टंट गिझरपासून ते मोठ्या स्टोरेज गिझरपर्यंत तुमच्या घरासाठी कोणती क्षमता सर्वोत्तम आहे, याबद्दल आपण जाणून घेऊया.
जर तुम्ही एकटे राहत असाल, कामासाठी किंवा शिक्षणासाठी बाहेर असाल तर ३ लिटर क्षमतेचा इन्स्टंट गिझर हा सर्वोत्तम पर्याय आहे. हा गिझर लहान आकाराचा असतो, त्यामुळे कमी जागा व्यापतो. मुख्य म्हणजे हा गिझर फक्त २ ते ३ मिनिटांत पाणी गरम करतो. एका व्यक्तीच्या आंघोळीसाठी किंवा दैनंदिन वापरासाठी तो पुरेसा असतो.
जर घरात दोन लोक असतील, तर ६ ते १० लिटर क्षमता असलेला गिझर एक चांगला पर्याय आहे. हा गिझर एका वेळी पुरेसे पाणी गरम करतो, ज्यामुळे दोन जण आरामात आंघोळ करू शकतात. हे गिझर स्टोरेजमधील पाणी बराच काळ गरम ठेवते. ज्यामुळे विजेचा वापर कमी होतो.
जर कुटुंबात तीन किंवा चार लोक असतील, तर १५ ते २५ लिटर क्षमतेचा स्टोरेज गिझर तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल. हे गिझर पुरेसे पाणी साठवते, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब एकामागून एक आरामात आंघोळ करु शकतात.
तसेच ४ सदस्यांसाठी सामान्यतः १५ लिटर आणि जर शॉवरचा वापर जास्त असेल तर २५ लिटर क्षमतेचा गिझर निवडणे योग्य ठरते. जर तुमच्या कुटुंबात ४ ते ६ लोक असतील, तर २५ ते ३५ लिटर क्षमतेचा स्टोरेज गिझर वापरा.
मोठे बाथरूम किंवा दोन बाथरूम असलेल्या घरांसाठी हे सर्वोत्तम मानले जाते. एकदा पाणी गरम केल्यानंतर पाणी बराच काळ गरम राहते. ज्यामुळे वारंवार गिझर चालू करण्याची आवश्यकता राहत नाही आणि ऊर्जा वाचते. त्यासोबतच वीज बिलातही बचत करू शकता.