बांबूपासून तयार होणारी फटांगरी लुप्त
esakal October 23, 2025 03:45 AM

बांबूची ‘फटांगरी’ लुप्त
प्रदूषणमुक्त मनोरंजनाचा वारसा संपुष्टात
डोंबिवली, ता. २१ : दिवाळीच्या काळात वाढणाऱ्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर, एकेकाळी लोकप्रिय असलेली बांबूपासून तयार होणारी ‘फटांगरी’ आज बाजारातून आणि लोकांच्या स्मृतीतून जवळपास दिसेनाशी झाली आहे. प्रदूषणावर नियंत्रण ठेवणारी आणि कोणालाही त्रास न देणारी, कमी आवाजाच्या पारंपरिक फटांगरीला मोठी मागणी होती; मात्र आता मोठ्या आवाजाच्या फटाक्यांनी बाजारपेठेत आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याने, बांबूची ‘फटांगरी’ कालबाह्य होत असल्याचे चित्र दिसत आहे.

शालेय परीक्षा संपल्यावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टीत किल्ले बनवण्यासोबतच ही ‘फटांगरी’ बनवण्याची ओढ लागत असे, परंतु मातीच्या किल्ल्यांची जागा जशी प्लॅस्टर ऑफ पॅरिसने घेतली, त्याचप्रमाणे बांबूच्या फटांगरीची जागा मानवी आरोग्यास आणि वन्यजीवांना हानिकारक असलेल्या रासायनिक फटाक्यांनी घेतली आहे. यामुळे दिवसेंदिवस मानवी आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

एका बांबूपासून साधारण १० ते १५ फटांगऱ्या तयार करता येतात. यासाठी बांबूची एक लाकडी नळी (फुकनी) घेऊन त्यात बसेल अशी दांडी तयार केली जाते. त्यानंतर शेताच्या बांधांवर आणि माळरानावर मिळणाऱ्या ‘चोपड’ नावाच्या गोल आकाराच्या गोळ्या या फटांगरीमध्ये टाकल्या जातात. त्या गोळ्यांमुळे फटाक्यासारखा आवाज येत असे.

बदलत्या काळानुसार प्रदूषणमुक्तीचा संदेश देणारे हे पारंपरिक मनोरंजनाचे साधन आता संपुष्टात येत आहे. विशेषतः शहरी भागांत या फटांगऱ्यांना मोठी मागणी असायची. कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर कॅम्प पाच परिसरात ग्रामीण भागातून फटांगरी आणि तिच्या गोळ्या विक्रीसाठी येत असत. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिर आणि डोंबिवलीच्या शास्त्रीनगर परिसरात त्या विक्रीसाठी उपलब्ध असायच्या, मात्र आता बदलत्या जीवनशैलीमुळे ‘फटांगरी’ शहरी भागातून हद्दपार झालीच आहे, पण ग्रामीण भागातूनही ती लुप्त होत असल्याचे दिसून येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.