लहान मुलं म्हणजे चमत्कारीकच असतात. त्यांना काय आवडेल हे सांगता येत नाही. तसंच ते कशावरून रागावतील हेही सांगता येत नाही. बरं रागावल्यानंतर काय करतील याचाही नेम नाही. एका चिमुकलीने तर चक्क देवालाच पत्र लिहिलं. पत्रात देवाकडे आईवडिलांची तक्रार केली. तक्रारही गोड होती आणि कारणही गोडच होतं. इंग्लडच्या समोरसेटमध्ये एका आठ वर्षाच्या चिमुकलीने आईवडिलांकडे एक पप्पी मागितली. आई वडिलांनी पप्पी देण्यासा नकार दिला. त्यामुळे लाडोबाई रुसल्या अन् तिने चक्क देवाकडेच मम्मी पप्पांची तक्रार केली.
न्यूजवीकने ही मजेशीर बातमी दिलीय. रागावलेल्या मुलीने चक्क देवाला पत्र लिहिलं. बरं मुलीने देवाला पत्र लिहिलं ही काही मोठी गोष्ट नव्हती. पण जेव्हा 6 महिन्याने या पत्राचं उत्तर आलं तेव्हा तिचे मम्मी पप्पाही आश्चर्यचकीत झाले. या पत्रातील उत्तरही मजेशीर होतं. तू कुत्रा पाळ असा सल्ला त्यात देण्यात आला होता. थेट देवाकडूनच उत्तर आल्याचं पाहून ही मुलगी जाम खूश झाली. पण हे पत्र आलं तरी कुठून? कुणी पाठवलं उत्तर? या विचारानेच मुलीच्या आईवडिलांना पछाडलं आहे.
काय होतं पत्रात…
या मुलीच्या आईने ही मजेशीर गोष्ट नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली. कुणी पत्र पाठवलं हे समजलं नाही. पण या मागचं रहस्य मला खूप आवडलं. पत्राचं उत्तर मिळणं नेहमीच चांगलं वाटतं, असं या मुलीच्या आईने म्हटलंय.
या मुलीच्या आईवडिलांनी मुलीचं पत्र आणि त्याला आलेलं उत्तर दोन्ही पत्रे 13 ऑक्टोबर रोजी रेडिटवर शेअर केलं आहे. माझ्या मुलीने देवाला लिहिलेल्या पत्राचं उत्तर कुणी दिलं? असं कॅप्शन रेडिटवर देण्यात आलं होतं.
आता नवा पेच
या घटनेनंतर आता नवा पेच निर्माण झाला आहे. या मुलीच्या आईवडिलांनी हा पेच सांगितलाय. माझ्या आठ वर्षाच्या मुलीला पाळीव कुत्रे खूप आवडतात. आमच्याकडे आधी एक कुत्रा होता. पण ती वारंवार रेस्क्यू सेंटरमधून अजून एक कुत्रा आणण्याची मागणी करत होती. आम्ही तिला अजून एक कुत्रा घरी आणण्यास नकार दिला. त्यामुळे ती त्रस्त झाली आणि नाराजही झाली होती. त्यातच तिला आम्ही पप्पी दिली नाही. त्यामुळे तर तिचं नाक रागाने लालेलाल झालं. त्यानंतर ती बेडरूममध्ये गेली आणि एक बंद लिफाफा घेऊन बाहेर आली, असं या पत्रात म्हटलंय.
तरीही देवाला पत्र
तिने लिफाफा लेटर बॉक्समध्ये टाकला. सहा महिन्यानंतर तिच्या नावावर एक टाईप केलेलं पत्र आलं. एका प्रीपेड रॉयल लिफाफ्यात होतं. त्यावर परतीचा पत्ता नव्हता. पोस्टल विभागाचा शिक्काही नव्हता. केवळ हाताने लिहिलेलं पत्र होतं.
ही चिठ्ठी मिळाल्यानंतर मुलीचे आईवडील घाबरून गेले होते. एक तासभर तणावात होते. नंतर त्यांना मुलीने लिहिलेलं पत्र आठवलं. या पत्रात कुत्रा दत्तक घेण्याचं माझं स्वप्न पूर्ण होईल का? असा सवाल या मुलीने केला होता. या पत्रात त्यावर उत्तर होतं. माफ करा. तुम्हाला पत्र लिहिण्यात उशीर झाला. ईश्वराला वाटतं तुझी या गोष्टीबाबत हरकत नसावी. देवानेच मला पत्र लिहायला सांगितलं आहे. देव प्रत्येकाची प्रार्थना ऐकतो. तो योग्यवेळी उत्तर देतो. तुला कुत्रा पाळण्याचा सल्ला दिला जात आहे, असं या चिठ्ठीत म्हटलं होतं. त्यानंतर या मुलीने कुत्रा पाळण्याचा हट्ट धरलाय.