वीज चोरीच्या प्रकारांना लगाम
esakal October 24, 2025 05:45 AM

वीजचोरीच्या प्रकारांना लगाम
२९ टक्के स्मार्ट मीटर, मोबाईलवर मिळणार माहिती
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २३ : रायगड महावितरण विभागामधील २७ टक्के वीजमीटर बदलण्याचे काम पूर्ण झाले असून, मीटरही कार्यान्वित झाले आहेत. स्मार्ट मीटरविरोधात रायगडमध्ये सुरुवातीला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर मीटरचे फायदे, पारदर्शकता ग्राहकांना समजून येत आहे. यामुळे वीज वापराचे मीटर रींडग घेण्यात सुलभता, अचूकता येणार असल्याचा दावा महावितरण कंपनीने केला आहे.
घरगुती, वाणिज्य वीजग्राहकांकडून होणाऱ्या विजेचा वापर नोंदवण्यासाठी वापरात असणाऱ्या जुने मीटर बदलून त्याऐवजी सीम कार्ड असणारे स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. यासाठी महावितरण कंपनीने तीन परिमंडळ क्षेत्रात ७,५९४ कोटींचा ठेका दिला आहे. यामध्ये जुने वीजमीटर काढून त्याजागी जीनियस, सिक्युअर व एसपीएल कंपनीचे स्मार्ट मीटर बसवण्याचे अंतर्भूत आहे. कोकण विभागात सुमारे ३५ लाखांपेक्षा अधिक स्मार्ट मीटर बसवण्यात आले. रायगड जिल्ह्यात सात लाख ४४ हजार एकूण वीजग्राहक आहेत. यातील दोन लाख १२ हजार मीटर बदलून तेथे नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात आले. ही टक्केवारी २९ असून, उर्वरित कामही लवकरच पूर्ण होईल, असे म्हणणे महावितरणचे रायगड जिल्हा कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांचे आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय कार्यालय तसेच बंद असणारे मीटर बदलण्याकडे प्राधान्य दिले आहे.
----
स्मार्ट मीटरमध्ये सीम कार्ड असल्याने दर महिन्याच्या ठरावीक तारखेला स्वयंचलित पद्धतीने मीटरचे रींडग घेतले जाते. या मीटरमुळे मानवी हस्तक्षेप, रींडग घेण्यास होणारा विलंब, चुका टळता येतील. तसेच विजेचा अवास्तव वापर ग्राहकाला टाळता येईल.
- धनराज बिक्कड, कार्यकारी अभियंता, महावितरण विभाग रायगड
----

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.