वैद्यकीय प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या
१५२ विद्यार्थ्यांची तपासणी सुरू
मुंबई, ता. २३ ः वैद्यकीय प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीमध्ये नवीन इच्छुक १५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरताना चुकीची कागदपत्रे अपलोड केली होती. याबाबत सीईटी कक्षाकडे काही तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची शहानिशा केल्यानंतर १५२ विद्यार्थ्यांची कागदपत्रे चुकीची आढळून आली.
या विद्यार्थ्यांना नोटीस पाठवून त्यांना त्यांची मूळ व अस्सल कागदपत्रे पुन्हा अपलोड करण्यास सांगितले. यातील एका विद्यार्थ्याने त्याची कागदपत्रे अपलोड केली. या सर्व १५२ विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. मेडिकल कौन्सिलिंग समितीकडे या सर्व विद्यार्थ्यांचा संपूर्ण तपशील मागविण्यात आला आहे. या तपशिलाची तपासणी केल्यानंतर या विद्यार्थ्यांबाबत निर्णय घेतला जाईल.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे वैद्यकीय प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीमध्ये नवीन इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश अर्ज भरला. या नवीन इच्छुक विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांबाबत सीईटी कक्षाकडे तक्रारी प्राप्त झाल्या. यानंतर या तक्रारींची सीईटी कक्षाने प्राथमिक तपासणी केली असता यातील १५२ विद्यार्थ्यांनी अपलोड केलेली कागदपत्रे चुकीची असल्याचे आढळून आले होते. याबाबत या १५२ इच्छुक विद्यार्थ्यांना सीईटी कक्षाने ईमेलवर नोटीस दिली आणि या विद्यार्थ्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी व मूळ तसेच अस्सल कागदपत्रे पुन्हा अपलोड करण्यासाठी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत वेळ दिली होती. यातील एका विद्यार्थ्याने आपली मूळ व अस्सल कागदपत्रे सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर अपलोड केली. सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.
एमसीसीकडून तपशील मागविला
१५२ विद्यार्थ्यांनी ईमेल व दूरध्वनी क्रमांक व इतर तपशीलही चुकीचा टाकलेला आहे. यामुळे नॅशनल मेडिकल कमिशनच्या प्रवेशाचे कार्य पाहणाऱ्या मेडिकल कौन्सिलिंग समितीकडे सीईटी कक्षाने ईमेल पाठवून या सर्व १५२ विद्यार्थ्यांचा सर्व तपशील मागविला आहे. त्यांच्याकडून तपशील आल्यानंतर व त्या तपशिलाची तपासणी केल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाईल.