विरार, ता. २३ (बातमीदार) : जूचंद्र येथील सर्वपक्षीय मंडळी निवडणुकीत एकमेकांना प्रखर विरोध करतात, परंतु समाजकार्यासाठी हातात हात देऊन एकत्र येतात ही सुखद बाब आहे, असे प्रतिपादन माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केले. जूचंद्र येथील श्री चंडिकादेवी मंदिरात नव्याने बसविण्यात येणाऱ्या उद्वाहकच्या बांधकामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले, की श्री चंडिकादेवी न्यासने वेगवेगळे उपक्रम राबवून मंदिर विकासाला गती दिली आहे. सध्या मंदिराची जमीन वन खात्याची असली तरी ही जमीन ट्रस्टच्या नावाने करण्यासाठी सरकारी कामासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास मी तयार आहे. जीवदानी मंदिर ट्रस्टप्रमाणे आपणही एक पंचवार्षिक योजना तयार केली, तर या मंदिराची अनेक विकासकामे मार्गी लागतील, असे त्यांनी सांगितले. माजी सभापती कन्हैया भोईर यांनी सांगितले, की श्री चंडिकादेवी मंदिराचा विकास चांगल्या पद्धतीने होत आहे. पूर्वी मंदिर विकासकामासाठी विविध नाट्यप्रयोग सादर करून मिळणाऱ्या पैशातून यात्रोत्सव, नवरात्रोत्सव आणि इतर विकासकामे करावी लागत.
जय चंडिका ज्येष्ठ नागरिक संघातर्फे हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट, मिठाई, साबन, उटणे, दिनदर्शिकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ व मंदिर ट्रस्टचे कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी जनार्दन म्हात्रे, दत्तात्रेय पाटील, चंद्रपाडा सरपंच दिनेश काटेला, उपसरपंच हेमराज भोईर, विवेकानंद पाटील, जयंत म्हात्रे, श्री चंडिकादेवी न्यासचे अध्यक्ष देवेंद्र किणी, माजी अध्यक्ष केदारनाथ पाटील, हरीहर पाटील, मनोहर पाटील उपस्थित होते.