वेळ आलेली, विचित्र अपघात, बाइक बसखाली येऊन भीषण स्फोट, जागेवरच 20 प्रवासी जिवंत जळाले
Tv9 Marathi October 25, 2025 01:45 AM

एक भीषण अपघात झाला आहे. प्रवासी बसला अचानक आग लागली. या दुर्घटनेत 20 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अजूनपर्यंत अधिकृत पुष्टी झालेली नाही. बसमध्ये 40 प्रवासी होते. बसने पेट घेताच 10 ते 12 प्रवाशी उड्या मारुन पळाले. घटनास्थळी बचाव पथक पोहोचलं आहे. हैदराबादवरुन बंगळुरुला जाणाऱ्या बसची एक बाइक बरोबर धडक झाली. बाइक बसच्या खाली अडकली आणि एक भीषण स्फोट झाला. त्यानंतर तात्काळ आग लागली. प्रत्यक्षदर्शींनुसार हा अपघात शुक्रवारी पहाटे 3 च्या सुमारास झाला. ही बस बंगळुरुच्या दिशेने चाललेली. घटनेच्यावेळी परिसरात पाऊस सुरु होता. त्यामुळे रस्ता निसरडा झालेला. आंध्र प्रदेशच्या कुरनूल जिल्ह्यात कल्लूर येथील चिन्नाटेकुरु गावाजवळ हा भीषण अपघात झाला.

बसमध्ये जवळपास 40 प्रवासी होते. बाइकचा स्फोट झाल्यानंतर काही वेळात बसला आगीच्या ज्वाळांनी वेढलं. 12 प्रवासी कसेबसे इमर्जन्सी एग्झिटमधून बाहेर पडण्यात यशस्वी ठरले. स्थानिक लोकांनी लगेच मदत कार्य सुरु केलं. पोलीस आणि फायर ब्रिगेडला सूचना दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झालेली.

काही मृतदेह इतक्या वाईट पद्धतीने जळालेत की त्यांची ओळख पटवणं कठीण बनलय. यावरुन अपघात किती भयानक होता, याची कल्पना येते. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनुसार, काही जखमींची प्रकृती गंभीर आहे.

हा अपघात घडला कसा?

बसमधील प्रवाशांपैकी बहुतांश हे हैदराबाद आणि बंगळुरु दरम्यान काम करणारे प्रवासी असल्याचं सांगितलं जातय. पोलिसांनी घटनास्थळ सील करुन तपास सुरु केला आहे. प्रारंभिक चौकशीत अशी शंका आहे की, बस चालक खूप वेगात होता आणि पावसामुळे दृश्यमानता कमी असल्यामुळे समोरुन येणारी बाइक दिसली नसावी.

सध्या अपघाताबद्दल कुठलही अधिकृत स्टेटमेंट जारी केलेलं नाही. स्थानिक प्रशासनाने मृतकाच्या कुटुंबियांना शक्य ती सर्व मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. या अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षा आणि खासगी बस संचालनाच्या नियमांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालय.

FSL टीम घटनास्थळी

अपघाताची माहिती मिळताच FSL टीम घटनास्थळी पोहोचली व अपघाताच्या कारणांचा शोध घ्यायला सुरुवात केली असं रनूलचे एसपी विक्रांत पाटील यांनी सांगितलं. पोलिसांनी बसच्या एका अतिरिक्त ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आहे. मुख्य ड्रायव्हरला ट्रॅव्हल कंपनीमधून बोलवून घेण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं. त्यांनी मुख्य सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून मदत आणि बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जखमी आणि मृतांच्या कुटुंबाना शक्य ती सर्व मदत देऊ असं सांगितलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.