भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेची सांगता तिसऱ्या आणि अंतिम सामन्याने होणार आहे. उभयसंघातील तिसरा सामना हा सिडनीत शनिवारी 25 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याने वनडे सीरिजचा शेवट होणार आहे. त्यानंतर उभयसंघात 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीचा हा ऑस्ट्रेलियातील शेवटचा एकदिवसीय सामना आहे. दोघेही कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील हा दोघांचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असल्याचं निश्चित समजलं जात आहे. दोघेही टी 20i आणि टेस्ट फॉर्मटमधून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे आता हे दोघे पुन्हा कधी खेळताना दिसणार? भारताची पुढील एकदिवसीय मालिका कधी आणि कुणाविरुद्ध असणार? हे जाणून घेऊयात.
रोहित आणि विराट या दोघांनीही टी 20i आणि टेस्ट क्रिकेटला अलविदा केला आहे. दोघेही आता वनडे फॉर्मेटमध्येच खेळत आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा या दोघांना ब्लु जर्सीमध्ये पाहण्यासाठी उत्सूक आहेत. रोहित आणि विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पुन्हा केव्हा एकदिवसीय सामने खेळणार हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे. दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी 20i सीरिज खेळणार आहे. विराट आणि रोहित मायदेशातील या वनडे सीरिजमध्ये खेळताना दिसणार आहेत. हे दोघे उपलब्ध असल्यास आणि त्यांना संधी मिळाल्यास दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरिजमध्ये खेळताना दिसतील.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. पहिला सामना हा 30 नोव्हेंबरला होणार आहे. दुसरा सामना 3 डिसेंबरला आयोजित करण्यात आला आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना 6 डिसेंबरला होणार आहे.
पहिला सामना, रविवार, 30 नोव्हेंबर, रांची
दुसरा सामना, बुधवार, 3 डिसेंबर, रायपूर
तिसरा सामना, शनिवार, 6 डिसेंबर, विशाखापट्टणम
दरम्यान शुबमन गिल याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे कॅप्टन म्हणून मायदेशातील पहिलीच एकदिवसीय मालिका असणार आहे. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची 3 सामन्यांची मालिका गमावली. त्यामुळे शुबमन मायदेशात आणि एकूणच पहिली मालिका जिंकणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.