Ajit Pawar: पन्नास हजार कुटुंबांची दिवाळी नव्या घरात; अजित पवार यांच्या घोषणेची बीडमध्ये पूर्तता
esakal October 26, 2025 12:45 AM

बीड : ‘दिवाळी नवीन घरकुलात’ अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हाती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्या बैठकीत केली होती. त्यांच्या घोषणेची पूर्तता करण्यासाठी यंत्रणेने मेहनत घेतली आणि त्यांच्या घोषणेची अंमलबजावणी यशस्वी केली.

पंतप्रधान आवास योजना तसेच राज्य पुरस्कृत घरकुल योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५० हजारांहून अधिक घरकुले पूर्ण झाली आहेत. यामुळे ५० हजारांहून अधिक कुटुंबीयांना यंदाची दिवाळी नव्या घरात साजरी करता आली.

वेळेत घरकुल उभारणी आणि घरकुलांच्या संख्येचा जिल्ह्याने राज्यात विक्रम स्थापित केला आहे. या कामासाठी सरकारकडून ९९० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. पायाभरणीनंतर दुसरा हप्ता वर्ग केला जातो. म्हणजेच, पूर्ण झालेल्या ५० हजार घरकुलांनंतर आणखी ८२ हजार घरकुलांची कामे वेगात सुरू आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्या आढावा बैठकीत घोषणा केली होती, की पंतप्रधान आवास योजनेतून जिल्ह्यातील किमान ५० हजार गरीब लाभार्थी यंदाची दिवाळी नव्या घरात साजरी करतील.

काटेकोर नियोजन

यंत्रणेने काटेकोर नियोजन करत पाठपुरावा सुरू ठेवला. यासाठी (सॉफ्ट) ॲपचा उपयोग झाला. या ॲपद्वारे प्रत्येक अधिकाऱ्याला विशिष्ट प्रभागाची जबाबदारी देण्यात आली. लाभार्थींना बांधकाम सुरू ठेवण्यास त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेची आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या घोषणेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. सर्व यंत्रणेच्या सामूहिक प्रयत्नांतून चार महिन्यांत ४० हजार घरकुलांची उभारणी पूर्ण झाली.

- जितीन रहमान, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.