पिंपरी, ता. २५ ः हशा, शिट्ट्या, प्रत्येक संवादानंतर पडणाऱ्या टाळ्या, काही प्रसंगांना मिळालेली वन्स मोअरची दाद असे वातावरण चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शुक्रवारी (ता.२४) अनुभवायला मिळाले. निमित्त होते सकाळ नाट्य महोत्सवार्तंगत आयोजित ‘ऑल द बेस्ट ’ या नाटकाच्या प्रयोगाचे. प्रयोग सुरू होण्यापूर्वीच प्रेक्षागृहात रसिकांनी केलेली गर्दी, सादरीकरणाला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, कलाकारांच्या सत्काराच्या वेळी दिलेले उभे राहून केलेला टाळ्यांचा कडकडाट यामुळे या नाटकाचा प्रयोग बेस्टच ठरला.
ऑल द बेस्ट या नाटकाची कथा बेतलेली आहे तीन मित्रांच्या आयुष्यावर. यातील एक मित्र आंधळा, एक मुका तर एक मित्र बहिरा असतो. हे तिघेही एकाच घरात राहत असतात. त्यामुळे एकमेकांशी संवाद साधताना घडणारे धमाल किस्से, घरी आलेल्या मैत्रिणीपासून आपले सत्य लपवताना उडणारी तारांबळ हे सगळे काही या नाटकात उत्तमरीत्या मांडले आहे. हे तिघेही मित्र एकाच मुलीच्या प्रेमात पडतात आणि तिला आपल्या प्रेमात पाडण्यासाठी काय काय प्रयत्न करतात हे नाटकाच्या उत्तरार्धात उलगडत जाते. नाटकातील मुख्य कलाकार मयुरेश पेम, मनमीत पेम, निखिल चव्हाण, अवंतिका कवठेकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. नाटकाच्या मध्यंतराच्या वेळी या कलाकारांचा सकाळ माध्यम समूहाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आज समारोप
दिवाळीच्या सुट्ट्यांची पर्वणी साधून सकाळ माध्यम समूहाने पिंपरी चिंचवडमधील नाट्य रसिकांसाठी ‘सकाळ नाट्य महोत्सवा’ची मेजवानी आयोजित केली आहे. २३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान पार पडणाऱ्या या नाट्यमहोत्सवात एकापेक्षा एक सरस नाटकांचे प्रयोग सादर होत आहेत. आज ‘पुन्हा सही रे सही’ या भरत जाधव यांच्या लोकप्रिय नाटकाने महोत्सवाची सांगता होईल.
काय ? ः सकाळ नाट्य महोत्सव
कुठे ? ः प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
कधी? ः २६ ऑक्टोबरपर्यंत
केव्हा ? रात्री ९ वाजता
नाटक ः पुन्हा सही रे सही
सवलतीच्या दरात तिकिटे
तळमजला ः ५०० रुपये प्रतिनाटक
बाल्कनी ः ४०० रुपये प्रतिनाटक
ऑनलाइन तिकिटे ः bookmyshow , ticketalay
फोन बुकिंग ः ९६०२०२७६७६
अधिक माहितीसाठी संपर्क ः
७७०९०९७११ ः नितीश
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहावर तिकीटविक्री ः सकाळी ९ ते ११.३० व सायं ५ ते ८