महायुतीसह उमेदवार निवडीचे सर्वाधिकार तटकरेंकडे
esakal October 25, 2025 01:45 AM

महायुतीसह उमेदवार निवडीचे सर्वाधिकार तटकरेंकडे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सर्वानुमते ठराव मंजूर
रोहा, ता. २३ (वार्ताहर) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात महायुती व स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निवडीसाठी सर्वाधिकार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. या निर्णयासंदर्भात आयोजित बैठकीत तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे यांनी ठराव मांडला, तर माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी त्याला अनुमोदन दिले. उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात ठराव सर्वानुमते मंजूर केला.
बैठकीत मार्गदर्शन करताना खासदार तटकरे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेण्याचा इशारा दिला. त्यांनी म्हटले, रोहा अष्टमी नगरपालिकेवर पाचव्या वेळी एकहाती सत्ता मिळवून असा विजय मिळवावा की विरोधक परत निवडणूक लढण्याची हिंमत करणार नाहीत. बैठकीत मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, शहर अध्यक्ष अमित उकडे, महिला आघाडी अध्यक्षा प्राजक्ता चव्हाण, युवक अध्यक्ष सागर बोभड, विद्यार्थी संघटना अध्यक्ष यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार तटकरे यांनी मागील २० ते २५ वर्षांत केलेल्या विकासकामांचा आढावा घेत सांगितले की, विकासकामांच्या जोरावर पक्ष पुन्हा नगरपालिकेत बहुमत मिळवेल. आदिती तटकरे उपस्थितांना संबोधित करत म्हणाल्या, की रोहा अष्टमी नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहणार आहे. विरोधकांच्या तथ्यहीन प्रचाराला आमच्या कार्यकर्त्यांनी रोखठोक उत्तर द्यावे. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी महायुती संदर्भात स्पष्ट केले की, निवडणुकीचा निर्णय पक्षनेते जो करतील, त्याचे पालन करून प्रत्येक उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसोबत जोमाने काम करेल. त्यांनी विरोधकांना आरेला कारे करण्याचा इशारा देत, आता चोख आणि रोखठोक उत्तर दिले जाईल, असे स्पष्ट केले. बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी तयारीच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद दिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.