आशियाई तायक्वांदो स्पर्धेसाठी सहा खेळाडूंची निवड
कल्याण, ता. २३ (वार्ताहर) : तायक्वांदो क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने मोठी कामगिरी केली असून, राज्यातील सहा युवा खेळाडूंची आशियाई युवा तायक्वांदो स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. महाराष्ट्रासाठी हा अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे, कारण राज्याने प्रथमच अशी लक्षणीय कामगिरी नोंदवली आहे. ही स्पर्धा २३ ते २६ ऑक्टोबरदरम्यान बहरीन येथे होणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत कठोर निवड प्रक्रियेतून भारतीय संघात प्रिशा शेट्टी (सातारा), धनश्री पवार (पुणे), किसारा रेड्डी (अहिल्यानगर), अक्षरा शानबाग (मुंबई), आर्यन जोशी (पुणे), समर्थ गायकवाड (मुंबई उपनगर) या खेळाडूंची निवड झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हे सर्व खेळाडू लखनऊ, उत्तर प्रदेश येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण प्रशिक्षण केंद्रात सराव करत आहेत.
खेळाडूंचा प्रवास, निवास, भोजन आणि प्रशिक्षण खर्च भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाकडून केला जात आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाने निवड झालेल्या खेळाडूंचा नुकताच नवी दिल्ली येथे सत्कार केला. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील दोन प्रशिक्षकांचीही निवड झाली आहे. प्रणव निवांगुणे (पुणे) आणि राजन सिंग (मुंबई उपनगर) हे भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
या अभूतपूर्व यशात इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर व तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष संदीप ओंबासे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच अमजदखान पठाण (सरचिटणीस) आणि डॉ. प्रसाद कुलकर्णी (खजिनदार) यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणी सदस्यांनी व्यावसायिकता आणि प्रेरणा टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाठिंबा दिला आहे.