ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेड ओव्हलवर झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने अर्धशतक पूर्ण केले.
शर्माने श्रेयस अय्यरसोबत शतकी भागीदारीही केली.
यासोबतच रोहित शर्माने तीन मोठे विक्रमही केले.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात दुसरा वनडे सामना ऍडलेड ओव्हल स्टेडियमवर गुरुवारी झाला. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारतासाठी हा सामना महत्त्वाचा आहे, मात्र या सामन्यात भारताची सुरुवात संघर्षपूर्ण झाली आहे. पण असे असले तरी या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने मोठा विक्रम केला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. भारताकडून शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात केली होती. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांच्या तिखट माऱ्यासमोर दोघांनी संयमी सुरुवात केली होती.
त्यातच तिसऱ्या षटकात रोहित शर्मा धावबाद होता होता थोडक्यात बचावला होता. त्यावेळी तो एक धावेवरच होता. गिलने मारलेल्या शॉटवर एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, पण रोहित परत मागे फिरला आणि त्याने डाईव्ह मारली. त्यामुळे चेंडू स्टंपवर येण्यापूर्वी त्याची बॅट क्रीजमध्ये आल्याने धावबाद होण्यापासून वाचला.
AUS vs IND 2nd ODI: विराट कोहली पुन्हा शून्यावर बाद, १७ वर्षांत पहिल्यांदाच 'असं' घडलं; शुभमन गिलही स्वस्तात आऊटमात्र, त्याच षटकात त्याने नंतर चौकार मारला आणि त्याने ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत १००० धावा पूर्ण केल्या. त्यामुळे रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये वनडेत १००० धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी असा पराक्रम कोणालाही करता आला नव्हता.
दरम्यान, सुरुवातीला धावांसाठी संघर्ष केल्यानंतर मात्र रोहित शर्माने चांगला खेळ केला. दरम्यान, ७ व्या षटकात झेव्हियर बार्टलेटने शुभमन गिल आणि विराट कोहली यांना स्वस्तात बाद केल्यानंतर रोहितने श्रेयस अय्यरसोबत शतकी भागीदारी केली.
या दोघांनी एकमेकांना चांगली साथ देताना भारताला १०० धावांचा टप्पाही पार करून दिला. या दरम्यान, रोहितने ७४ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. रोहितचे हे वनडे कारकिर्दीतील ५९ वे अर्धशतक आहे.
रोहितने अर्धशतकानंतरही त्याचा खेळ पुढे सुरू ठेवला होता. यादरम्यान श्रेयस अय्यरनेही अर्धशतक पूर्ण केले. पण अखेर रोहितला मिचेल स्टार्कने रोहितला ३० व्या षटकात ९७ चेंडूत ७३ धावांवर बाद केले. रोहितने ७ चौकार आणि २ षटकार मारले.
रोहितने या अर्धशतकादरम्यान काही मोठे विक्रमही केले. यातील महत्त्वाचा विक्रम म्हणजे रोहित शर्माने सौरव गांगुलीला मागे टाकले असून आता तो भारताला वनडेतील दुसरा यशस्वी सलामीवीर झाला आहे.
वनडेत सलामीला सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये आता रोहित सचिन तेंडुलकरपाठोपाठ दुसर्या क्रमांकावर आला आहे. त्यामुळे सौरव गांगुली तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
सचिन तेंडुलकरने वनडेत ३४४ सामन्यात सलामीला फलंदाजी करताना १५३१० धावा केल्या आहेत. तसेच रोहित शर्माने १८८ वनडे सामन्यांत सलामीला खेळाताना ९२०० धावांचा टप्पा पार केला आहे. सौरव गांगुलीने ९१४६ धावा २४२ वनडेत सलामीला फलंदाजी करताना केल्या होत्या.
वनडेत सलामीला सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू१५३१० धावा - सचिन तेंडुलकर (३४४ सामने)
९२०० धावा* - रोहित शर्मा (१८८ सामने)
९१४६ धावा - सौरव गांगुली (२४२ सामने)
७५१८ धावा - विरेंद्र सेहवाग (२१४ सामने)
६७९३ धावा - शिखर धवन (१६६ सामने)
याशिवाय रोहित शर्माने SENA देशात म्हणजेच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या चार देशात मिळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५० षटकारही पूर्ण केले आहेत. त्यामुळे तो असा पराक्रम करणारा पहिलाच आशियाई खेळाडू ठरला आहे. यापूर्वी आशिया खंडातील कोणत्याही खेळाडूला SENA देशांमध्ये मिळून १५० षटकार मारता आले नव्हते.