निमगाव केतकी, ता.२५ : मकेला शासनाचा २४०० रुपये हमीभाव असताना सध्या ती सोळाशे ते अठराशे रुपये क्विंटल बाजारभावाने घेतली जात आहे. यामध्ये उत्पादकाला लुटले जात आहे. जिल्हात विविध भागात हमीभाव मका खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी क्रांतिसिंह नानापाटील ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शिवाजी नांदखिले यांनी केली.
निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील बलिप्रतिपदेला सुवर्णयुग गणेश मंदिराच्या प्रांगणात शेतकरी संघटनेच्या वतीने बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नांदखिले बोलत होते. पुढे ते म्हणाले की, बळीचे राज्य हे शोषणमुक्त होते म्हणून आजही मायमाऊली म्हणत असते. ईडा पिडा टळू दे बळीच राज्य येऊ दे. खरोखरीच बळीचे राज्य आणायचे असेल तर बळी कोण आहे हे शोधून मतदान करावे लागेल.
जिल्हा शेतकरी सुकाणू समितीचे अध्यक्ष ॲड. श्रीकांत करे म्हणाले की, शासनाने मका पिकाला २४०० रुपये हमीभाव घोषित केला आहे. मात्र, याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा नाही. यंदा सततच्या पावसामुळे उत्पादनात घट झाली आहे. खरेदी करताना विविध कारणे सांगून सोळाशे ते दोन हजार रुपयांपर्यंतच मकेची खरेदी केली जात आहे. सातबारा वरील मका पिकाची अट काढून टाकावी व सरसकट हमीभावाने मकेची खरेदी शासनाने करावी.
शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ॲड. पांडुरंग रायते, शेतकरी मित्र बापू चांदणे व दीपक भोंग यांनी आपले विचार मांडले. यावेळी शेतकरी संघटनेचे दादा किरकत, निळकंठ शिंदे, शशिकांत कुंभार, मंगेश घाडगे, गुलाबराव फलेफले, तुकाराम निंबाळकर, प्रशांत मानकर, अनिल शिंदे, दत्तात्रेय मिसाळ, हिरामण जाधव, दादा भिसे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
02999