- rat२७p१४.jpg-
२५O००७५७
रत्नागिरी : ज्येष्ठ नागरिक संघांचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीरंग कद्रेकर यांचा सत्कार करताना जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षा समिती हवी
सुभाष थरवळ ः रत्नागिरीत ज्येष्ठ नागरिक संघाचा ३४वा वर्धापनदिन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : ज्येष्ठ नागरिक संघाना शासकीय भूखंड देणे, नगरपालिका, नगरपंचायतींनी स्वमालकीच्या जागेत सुसज्ज विरंगुळा केंद्र निर्माण करणे, जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात ज्येष्ठ नागरिकाच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिक सुरक्षा समिती स्थापन करणे असे सर्वच प्रश्न प्रलंबित आहेत, असे रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिक दिन आणि रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या ३४व्या वर्धापनदिनानिमित्त शिवाजीनगर येथील संघाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी संघांचे माजी अध्यक्ष व कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी वयाचा ९५ वर्षाचा टप्पा ओलांडल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आणि समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे उपस्थित होते. या वेळी वयाची ९५, ९०, ८५, ८० व ७५ वर्षे पूर्ण केलेल्या, वैवाहिक सहजीवनाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. सप्टेंबर २०२५ मधील सामूहिक वाढदिवस कार्यक्रम साजरा करताना संबंधित सभासदांचाही सत्कार करण्यात आला. जिल्हा माहिती अधिकारी सातपुते यांनी ज्येष्ठांची उत्साही उपस्थिती पाहून समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघांचे प्रशासनाकडे प्रलंबित असलेले विविध प्रश्न हिरिरीने मांडून ते सोडवण्यासाठी संघांचे अध्यक्ष थरवळ सतत प्रयत्न करत असतात, असे त्यांनी सांगितले. या वेळी पद्मजा बापट यांनी आभार मानले.
---