तोंडातला घास पावसाने हिरावला
मुरूड तालुक्यातील ५० टक्के भातशेती पाण्याखाली
मुरूड, ता. २७ (बातमीदार)ः परतीच्या पावसाने खार अंबोलीसह खतिब, खार, जोसरांजण, तेलवडे, शिघ्रे, वावडुंगी भागातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ५० टक्क्यांहून अधिक कापलेले भात भुईसपाट झाले असून, मेहनतीचे फळ वाया गेल्याने शेतकरी निराश झाला आहे.
मुरूड तालुक्यात ३,२१० हेक्टर क्षेत्रांत भातलागवड केली जाते. सुन सुवर्णा, जया सारखे पारंपरिक वाण पेरले जातात. यंदा अनुकूल वातावरण असल्याने चांगले पीक येईल, अशी शक्यता होती, मात्र दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने उभे पीक आडवे केले आहे. पावसामुळे ओब्यांना कोंब फुटतील, अशी भीती व्यक्त होत आहे. पीक विम्याच्या बाबत कृषी विभागाकडून पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे वारंवार आवाहन केले जात असले तरी शेतकरीवर्गाने दरवर्षीप्रमाणे यंदाही विम्याचे कवच नाकारले आहे. भातशेतीचा उतारा हा महसूल विभागाकडून केलेल्या सर्वेक्षणात ५१ टक्के पेक्षा जास्त भरतो. परिणामी विमा कंपनीच्या निकषात बसत नसल्याने फायदा होत नसल्याची शेतकऱ्यांची समजूत आहे.
---------------------------
अल्प भूधारक संकटात
कापणीपूर्वी करपा रोगाचा भातशेतीवर प्रादुर्भाव होता. त्यात हाती येणारे पीक निसर्गाने हिसकावून घेतल्याने बळीराजा चिंतेने व्यापला आहे. खरीप हंगामातील भातशेती मुख्य आणि महत्त्वाचे एकच पीक असल्याने अल्प भूधारकांचे आर्थिक गणित बिघडल्याची स्थिती आहे. शासनाने नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करून दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.