जपूया बीज वारसा---------लोगो
(२१ ऑक्टोबर टुडे ३)
हवामान बदलाला तोंड देण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि कृती करण्यास प्रेरित करण्यासाठी दरवर्षी २४ ऑक्टोबर २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय हवामान कृती दिन साजरा केला जातो. हवामान बदल या समस्येवर उपाययोजना राबवण्यासाठी आणि शाश्वत भविष्याकरिता काम करण्यासाठी लोकांना एकत्र करण्यासाठी सुरू केलेली ही एक जागतिक चळवळ आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी निरोगी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी शाश्वत कृती करण्यास प्रोत्साहन देणे, हे या चळवळीचे मुख्य ध्येय आहे.
- rat२७p११.jpg -
25O00749
- कुणाल अणेराव,
वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, सृष्टिज्ञान संस्था
---
हवामान बदलाला
तोंड देण्याचे आव्हान
हवामान बदलाचा एक मुख्य परिणाम म्हणजे जागतिक तापमानवाढ होय. पृथ्वीवरील वातावरणाच्या सरासरी तापमानात सातत्याने होत असलेल्या वाढीला जागतिक तापमानवाढ असे म्हणतात. या तापमानवाढीला कारणीभूत असणाऱ्या वायूंना ग्रीनहाऊस गॅसेस म्हणजेच उष्माग्राही वायू असे म्हणतात. पृथ्वीच्या वातावरणातील उष्णता धरून ठेवणाऱ्या या उष्माग्राही वायूंमध्ये कार्बनडाय ऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि पाण्याची वाफ यांचा समावेश होतो.
पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडणारी सूर्यकिरणे उष्णतेच्या लहरींमध्ये परावर्तित होऊन उत्सर्जित होऊ लागतात. अशावेळी वातावरणातील पाण्याची वाफ, कार्बनडाय ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन इ. उष्माग्राही वायू ही उष्णता वातावरणातच धरून ठेवतात आणि त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तापमान वाढते. यालाच आपण इंग्रजीत ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणतात. उष्माग्राही वायूंचे वातावरणातील प्रमाण वाढत गेल्यामुळे २०व्या शतकात पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान ०.७४ अंश सेल्सिअसने वाढले. २१व्या शतकात हे तापमान १.१ अंश सेल्सिअस ते ६.४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. सध्या पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान १५ अंश सेल्सिअस आहे.
हे वायू मुख्यत: मानवनिर्मित क्रियेमधून तयार होतात. यात जागतिक पातळीवर शेती आणि इतर पूरक व्यवसाय यांचा वाटा १८.४ टक्के आहे. त्यात मुख्यत: भातशेती, पशुपालन, माती-खतव्यवस्थापन यांचा समावेश होतो. या संदर्भातील भारतातील आकडेवारी पुढीलप्रमाणे ः भारतातील ५८ टक्केपेक्षा जास्त ग्रामीण कुटुंबे शेतीवर जगत आहेत. भारतातील एकूण उष्माग्राही वायूउत्सर्जनात कृषिक्षेत्राचा वाटा सुमारे १८-१९ टक्के आहे. शेतीशी निगडित पशुपालन म्हणजेच गाई-बैल, शेळ्या, कोंबड्या आदींच्या शेण-लेंड्या-मूत्र यामुळे मिथेन हा वायू उत्सर्जित होतो. मिथेनच्या एकूण उत्सर्जनात पशुपालनाचा वाटा ५४.६ टक्के आहे. भातशेतीमध्ये खाचरात पाणी साठवले जाते. त्यामधून मिथेनचे १७.५ टक्के उत्सर्जन होते. रासायनिक शेती करताना वापरलेल्या युरियासारख्या रासायनिक खतांमुळे नायट्रस ऑक्साइड वायू १९.१ टक्के उत्सर्जित होतो. कोकणात पेरणीसाठी शेत तयार करण्यासाठी राब केला जातो म्हणजे आधीच्या पिकाची खोडके जाळली जातात. तसेच पंजाब, हरियाणामध्ये अशी खोडके मोठ्या प्रमाणावर जाळल्याने हिवाळ्यात दिल्लीची हवा प्रदूषित होते. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर धूर आणि कार्बनडाय ऑक्साइड तयार होतो. कमी तापमान आणि स्थिर हवा यासारख्या प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे धुरके तयार होतात. त्यामुळे दिल्ली शहरातील दृश्यमानता कमी होते तसेच नागरिकांना श्वसनसंस्थेचे विविध आजार होतात. अशावेळी सेंद्रिय शेतीचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. पशुपालनात तयार होणारे सेंद्रिय खत वापरून मातीचा कस टिकवावा लागेल. थेट पेरणी, सघन शेती अथवा श्री पद्धती यासारख्या भातशेतीच्या सुधारित पद्धती वापरून आणि पाण्याची बचत करावी लागेल. हवामान बदलाला तोंड देऊ शकतील स्थानिक आदिम बियाण्यांचा वापर केला तरच आपण खऱ्या अर्थाने हवामानबदल कृती दिन साजरा केला, असे म्हणता येईल.
(लेखक स्वत: शेतकरी असून, आदिम बियाणी संवर्धन करत आहेत.)