राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच घटक पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पहाता महाविकास आघाडी आणि महायुतीमधील प्रत्येक पक्षासाठी ही निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची असणार आहे. मात्र या निवडणुकीच्या तोंडावर आता पक्षांतराला वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश करायला सुरुवात केली, तेव्हापासून ते आजपर्यंत महाविकास आघाडीला गळती सुरूच आहे, याचा सर्वात जास्त फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे.
मात्र दुसरीकडे आता महायुतीमधल्याच घटक पक्षातील नेते हे भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. याचा मोठा फटका हा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला बसतान दिसत आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतरही पक्षप्रवेश सरूच आहे, आता राष्ट्रवादी अजित पवार गटाला परभणीत मोठा धक्का बसला आहे. खासदार आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये परभणीत भाजपचा मोठा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नरगराध्यक्ष विनोद बोराडे तसेच आमदार रत्नाकर गुट्टे यांचे निकटवर्तीय असलेले गणेश रोकडे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला देखील धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय साडेगावकर यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपात मोठं इन्कमिंग
पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्यापूर्वी भाजपात जोरदार इन्कमिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. विरोधी पक्षातून तर भाजपमध्ये प्रवेश सुरूच आहेत, मात्र आता मित्र पक्षातील नेते आणि पदाधिकारी देखील भाजपात प्रवेश करत आहेत, याचा फटका हा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला बसत आहे.