नागपूर : नागपूरसह पूर्व विदर्भामध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसानीसाठी शासनाने दिवाळीपूर्वीच निधीही दिला.
त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार अशी आशा होती. परंतु नागपूर जिल्ह्यात गुरुवारपर्यंत केवळ ४५.६७ टक्के म्हणजेच ४६ हजार ६६४ शेतकऱ्यांच्या खात्यावरच मदतीची रक्कम जमा झाली आहे.
सप्टेंबरच्या नुकसानीपोटी शासनाने पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांसाठी ३४० कोटी ९० लाख रुपये मंजूर केले. यामध्ये नागपूर जिल्ह्यासाठी ११२ कोटी ३६ लाख होते. जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे १ लाख २ हजार ८५० शेतकऱ्यांचे ८५ हजार ६४१ हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. या सर्वांना दिवाळीपूर्वी अर्थात लक्ष्मीपूजनापूर्वीच हा मदतनिधी देण्याची घोषणा शासनाने केली होती. त्यानुसार निधीही मंजूर केला.
५६ हजारांवर शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षाचविशेष म्हणजे सुटीच्या दिवशी (१८ ऑक्टोबर) निधी मंजुरीबाबतचा शासन निर्णय जाहीर केला. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर लक्ष्मीपूजनापूर्वी मदतनिधी जमा व्हावा यासाठी तालुकास्तरावरील यंत्रणाही या काळामध्ये शनिवार, रविवार असतानाही कामात होती.
प्रशासनाकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार केली. ती डीबीटी पोर्टलवर अपलोड करण्याच्या प्रक्रियेलाही गती दिल्याचे सांगण्यात येते. परंतु २३ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील १.०२ लाख ८५० बाधित शेतकऱ्यांपैकी ४५.६७ टक्के म्हणजेच, ४६ हजार ६६४ शेतकऱ्यांचीच यादी तालुकास्तरावरून अपलोड झाल्या. त्यानुसार यादी अपलोड केलेल्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर ५१ कोटी ३२ लाख २६ हजार ५८४ रुपयांचा निधीही वळता केला. अद्यापही जिल्ह्यातील ५६ हजार १८६ शेतकऱ्यांची यादी अपलोड व्हायची असल्याने त्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा झाली नसल्याचे वास्तव आहे.
मोठी बातमी! ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार अतिवृष्टी, महापुराची नुकसान भरपाई; सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे काय?प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार अनुदानास पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वळती होण्यासाठी विलंबाकरिता वेगवेगळी कारणे आहेत. यामध्ये काही लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक बॅंक खात्याशी सलग्न नसल्याने अनुदान मिळण्यास विलंब होत आहे. अशांनी तातडीने ई-केवायसी करावी. तर दुसरे सातबाऱ्यावर एकापेक्षा जास्त नावे असल्याने कुणाच्या खात्यावर अनुदान द्यायचे याबाबत त्यांच्याकडून संमतीपत्र अप्राप्त असल्याने अनुदान वाटपास विलंब होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
निधी मंजूर : ११२.३६ कोटी
बाधित शेतकऱ्यांची संख्या : १,०२,८५०
बाधित क्षेत्र :
८५,६४१.८८ हेक्टर
याद्या अपलोड केलेल्या
शेतकऱ्यांची संख्या : ४६,६६४
वाटप झालेले अनुदान :
५१.३२ कोटी
शिल्लक रक्कम :
६१.०४ कोटी