>> अक्षय मोटेगावकर
जग आणि जगातले प्रत्येक समाज हे थोडय़ाफार फरकाने कथेवरच पोसले गेलेले आहेत. पुराणकथांचा वारसा असणाऱ्या गोष्टीवेल्हाळ समाजात गप्पागोष्टी सांगणारी लक्ष्य माहेश्वरीची दास्तानगोइ निश्चितच आवडणारी.
लहानपणी समुद्रकिनाऱयावर फिरताना आपण कधी ना कधी शंख-शिंपले गोळा केले असतातच. त्यातला एखादा शिंपला जो आपल्यासाठी खास असतो. तसंच काहीसं माझ्या सतत काहीतरी नवं ऐकण्याच्या या प्रवासात एक किरमिजी रंगाचा शिंपला मला सापडला तो म्हणजे- यूटय़ुबवरचे लक्ष्य माहेश्वरीचे सिंगल हँडेडली हे चॅनेल.
लहानपणापासून लक्ष्यला गोष्टी सांगितलेल्या आणि सांगायला आवडत होत्या. शाळा, कॉलेजमध्ये हे सगळं तो आवडीने करायचा. पुढे मोठं झाल्यावर ‘एमबीए’ करून इन्व्हेस्टमेंट बँकर झालेल्या लक्ष्य माहेश्वरीचे खऱया अर्थाने आयुष्य बदलले ते म्हणजे इम्तियाज अलीच्या ‘तमाशा’ या चित्रपटाने. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणच्या अभिनयाने नटलेल्या या चित्रपटाची संकल्पनाच गोष्टीची होती. गोष्टीत रमणाऱया पात्रांची होती. गोष्टीची मज्जा अनुभवण्याची होती. लक्ष्यला प्रकर्षाने जाणवले की आपणसुद्धा सध्या जे करतो आहोत त्यापेक्षा आनंद आपल्याला गोष्टी सांगताना होतो आणि लक्ष्यने सिंगल हँडेडली हे चॅनेल सुरू केलं.
लक्ष्यचा मी पाहिलेला किंवा ऐकलेला सगळ्यात पहिला व्हिडीओ म्हणजे लक्ष्यने पीयूष मिश्राने कोक स्टुडिओसाठी गायलेल्या ‘हुस्ना’ या गाण्याच्या किश्श्याने. पाकिस्तानी कथा लेखक ए. हमीद यांच्या कथेवर आधारित ‘पत्तर अनारं दे’ या पीयूष मिश्रालिखित नाटकातले हे गीत. स्वातंत्रपूर्व काळातील एकसंध भारतात असणाऱया बारा मैत्रिणी भारत पाकिस्तानच्या वाटणीनंतर वेगवेगळ्या शहरांत पडतात आणि पुन्हा 20 वर्षांनंतर एका मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नासाठी आगऱयाला एकत्र जमतात. यात हुस्ना नावाची पण मैत्रीण असते, जिचे जावेदवर प्रेम असते, पण या भारत-पाकिस्तान वाटणीनंतर दोघे दुरावतात. जेव्हा या लग्नात जावेद हुस्नाबद्दल इतर मैत्रिणींकडे चौकशी करतो त्यावेळी त्याला लक्षात येते की, हुस्ना अजूनसुद्धा अविवाहित आणि एकटीच आहे आणि गेल्या वीस वर्षांत तिच्यावर अनन्वित अत्याचार झाले. हे ऐकून तो उदास होतो आणि गृहस्थ जीवनात असलेला हिंदुस्थानी जावेद पाकिस्तानी हुस्नाला पत्र लिहून विचारतो. ते पत्र म्हणजे हे हुस्ना गाणे. पीयूष मिश्रा, निलेश मिश्रा यांचे जसे माझ्या मनावर अद्भुत गारुड आहे तसाच काहीसा प्रभाव लक्ष्य माहेश्वरीचा आहे. लक्ष्य माहेश्वरी हा व्हिडीओजसाठी किस्से तयार करत नाही हे जाणवतच, कारण त्याचा मूळ स्वभावच गोष्टींमध्ये रमण्याचा आहे. त्यामुळे प्रत्येक गाण्यामागची, गोष्टीमागची, प्रथेमागची गोष्ट त्याला खुणावत राहाते. त्याने ‘तमाशा’ या चित्रपटावर 2 मोठे व्हिडीओज आवर्जून पाहावे असे आहेत.
भारतात ज्या कलाकाराचा आवाज पहिल्यांदा रेकॉर्ड केला गेला तो म्हणजे प्रसिद्ध गायिका गौहरजान. या गौहरजान यांची गोष्ट ऐकताना आपण विस्मयाने आणि अभिमानाने भरून पावतो, मौलाना हसरत मोहानी यांच्या ‘चुपके चुपके रात दिन’ या गझलेचे आणि शहीद भगतसिंगांचे अनोखे नाते, मध्यंतरी जगभरात प्रचंड गाजलेले गुजराती गाणे खलासी या गाण्यामागची कथा, पं. राम प्रसाद बिस्मिल यांच्या ‘रंग दे बसंती’ या गाण्यामागची आणि गाजलेल्या ओळीमागची कथा, ‘गल्लीबॉय’ या गाजलेल्या हिंदी चित्रपटातील गाणे ‘आझादी’ची मूळ कथा, ‘झूठ बोले कौव्वा कांटे’ या गाण्यामागची गोष्ट, प. बंगालमधील नवरात्रीत बनवल्या जाणाऱया देवीच्या मूर्ती आणि मुखवटा यासाठी लागणारी माती आणि वेश्या वस्तीचा संबंध, जगप्रसिद्ध इंग्रजी गाणे ‘यल्लो’ हे कसे तयार झाले ही कथा, ‘गँगस्टर’ चित्रपटात वापरलेले गाणे ‘भीगी भीगी सी’च्यामागची गोष्ट हे सर्व सांगताना लक्ष्यच्या डोळ्यात एक वेगळेच तेज दिसते. काहीतरी अद्भुत, रोचक गवसल्याचा आणि ते आपल्या जवळच्या मंडळींपर्यंत पोहोचवण्याचा त्याचा उत्साह, हातोटी आणि संकल्प वाखाणण्याजोगा आहे.
लक्ष्य माहेश्वरीचा मूळ पिंडच दास्तानगोइचा (कथा सांगण्याचा) आहे. कथेतील मर्मस्थान ओळखायचे, ते रंगवून प्रेक्षकांसमोर मांडायचे आणि त्यांना खिळवून ठेवायचे ही लक्ष्यची बलस्थानं. जग आणि जगातले प्रत्येक समाज हे थोडय़ाफार फरकाने कथेवरच पोसले गेलेले आहेत. त्यातही आपण भारतीय म्हणजे गोष्टीवेल्हाळ! गावात पारावरच्या गप्पा गोष्टी असो, आईने, आज्जीने रात्री झोपताना सांगितलेल्या गोष्टी, वर्गात गुरुजनांनी सांगितलेल्या गोष्टी वा चार मित्र जमले असताना एखाद्या मित्राने सांगितलेला किस्सा असो… हा सर्वांचाच आवडता विरंगुळा. याच विरंगुळ्याला लक्ष्यने आपलेसे करत लोकांसमोर मांडले. लक्ष्य माहेश्वरीचे चॅनेल, त्याचे व्हिडीओज तुम्हालादेखील आवडतील हा विश्वासच नाही, तर खात्री आहे.
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत
असून मुक्त लेखक आहेत.)
[email protected]