‘जाने भी दो यारो’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’, ‘उमराव जान’, ‘कभी हाँ कभी ना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारून लक्ष वेधून घेणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचं शनिवारी दुपारी 2.30 च्या सुमारास निधन झालं. ते मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शहा यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज (रविवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सतीश शहा यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. काजोल, करण जोहर, फराह खान, आर. माधवन यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शोक व्यक्त केला आहे. सतीश यांच्या ऑनस्क्रीन मुलाची भूमिका साकारलेला अभिनेता राजेश कुमारनेही भावनिक पोस्ट लिहिली आहे. सतीश शहा आणि राजेश कुमार यांनी ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या गाजलेल्या मालिकेत पिता-पुत्राची भूमिका साकारली होती. राजेश या मालिकेत रोशेश साराभाईच्या तर सतीश शहा हे त्याचे वडील इंद्रवदन साराभाईंच्या भूमिकेत होते.
राजेशने लिहिलं, ‘माझ्यासाठी हा खूप कठीण काळ आहे. सतीशजीआता या जगात नाहीत, हे मी अजूनही स्वीकारू शकत नाही. ते माझ्यासाठी वडिलांसारखे होते. ते आयुष्य हसत आणि भरभरून जगले. त्यांनी प्रत्येक गोष्टीला आव्हान दिलं होतं. अभिनेता म्हणून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आणि प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली. त्यांना गमावणं हे इंडस्ट्रीसाठी आणि साराभाईच्या कुटुंबासाठीही खूप मोठं नुकसान आहे. आपण सर्वांनी मिळून त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे.’
एकाच वेळी दूरचित्रवाणी आणि सिनेमा ही दोन्ही माध्यमे आपल्या विनोदी अभिनयाच्या शैलीने गाजवणारे सतीश शहा गेले काही महिने मूत्रपिंडाशी संबंधित आजाराशी झगडत होते. त्यांनी फिल्म टेलीव्हिजन इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचं शिक्षण घेतलं होतं. सत्तरच्या दशकांत त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. सतीश शहा यांना ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या लोकप्रिय मालिकेद्वारे ओळख मिळाली. 1972 मध्ये त्यांनी डिझायरन मधू शहाशी लग्न केलं. 1984 मध्ये त्यांनी टेलिव्हिजन विश्वात प्रवेश केला. ‘ये जो है जिंदगी’ या सिटकॉमच्या 55 भागांमध्ये त्यांनी 55 विविध भूमिका साकारल्या होत्या.