परदेशात राहून भारतात अमली पदार्थांची विक्री
esakal October 26, 2025 04:45 PM

परदेशात राहून भारतात अमली पदार्थांची विक्री
म्होरक्यासह १५ जणांना अटक; २६५ कोटींचे अमली पदार्थ हस्तगत
घाटकोपर, ता. २५ (बातमीदार) ः परदेशात राहून भारतात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या सुहेल शेख या म्होरक्याला घाटकोपर अमली पदार्थविरोधी पथकाच्या पोलिसांनी अटक केली. त्याला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. यापूर्वी त्याच्या १४ सहकाऱ्यांना अटक करून आजपर्यंत तब्बल २५६ कोटी ४९ लाख ९६ हजार ६२० रुपये किमतीचे अमली पदार्थ, दागिने, वाहने असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
हा आरोपी परदेशात (दुबई) राहुन त्यांच्या हस्तकांमार्फत भारतामध्ये अमली पदार्थाचे कारखाने चालवून अमली पदार्थ निर्मिती व विक्री करीत होता. याबाबत कुर्ला पोलिस ठाण्यात १६ फेब्रुवारी २०२४ रोजी गुन्हा दाखल केला होता. सयाजी पगारे चाळीच्या बाजूच्या पदपथावर, सीएसएमटी रोड, चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोड, कुर्ला येथून त्या वेळी अमली पदार्थ ताब्यात घेतले होते. आताही पुन्हा कारवाई करण्यात आली असून, यातील सर्व आरोपींची संख्या आता १४ पुरुष आरोपी आणि एक महिला अशी एकूण १५ झाली आहे. अमली पदार्थविरोधी शाखेच्या कक्ष-७, गुन्हे शाखा घाटकोपरमधील पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सुरुवातीला १६ फेब्रुवारी २०२४ रोजी सापळा रचून परवीन बानो गुलाम शेख हिला कुर्ला येथून ६४१ ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन हा अमली पदार्थ तसेच रोख रक्कम १२.२० लाख व २५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांसह अटक केली होती. आरोपी महिलेने हा मेफेड्रॉन अमली पदार्थ दुबईत वास्तव्यास असलेल्या गुन्ह्यातील त्या वेळी फरार आरोपीशी संपर्क करून त्याचा मुंबईतील हस्तक साजीद मोहम्मद आसिफ शेख याच्याकडून खरेदी केला होता. त्यावरून साजीद शेख ऊर्फ डॅब्ज याला अटक करून त्याच्या राहत्या घरातून मिरा रोड येथून सहा कोटी रक्कम जप्त केली होती. तर तपासादरम्यान दुबईतील पाहिजे आरोपीच्या संपर्कात राहून सांगली येथील मेफेड्रॉन तयार करण्याच्या कारखान्यात अमली पदार्थ तयार करण्यासाठी कच्च्या मालाचा पुरवठा करणारे, तयार झालेला अमली पदार्थ खरेदी करून विक्री करणारे सुरत येथील दोन आरोपींनाही याच गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.