सातारा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे दर महिन्याला पात्र लाभार्थी महिलांना 1500 रुपये दिले जातात. ऑक्टोबरच्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे राज्यातील पात्र लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीच बंद करणार नाही, असं म्हटलं आहे. ते फलटण येथील कार्यक्रमात बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपलं जे महायुतीचं सरकार आहे ते विकासाचा विचार करणारं सरकार आहे.आम्हाला समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विकास हवाय. या महाराष्ट्रातील दुष्काळी भाग आहे त्यातला दुष्काळ आम्हाला दूर करायचा आहे. आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आम्हाला मदत करायची आहे. आपण बघा महाराष्ट्रतल्या शेतकऱ्यांवर संकट आल्यानंतर आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठं पॅकेज 32 हजार कोटी रुपयांचं पॅकेज त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांकरता दिलं आणि आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाणं देखील सुरु झालं आहे. कुठल्याही परिस्थितीत आम्ही सुरु केलेल्या योजना कधीच बंद होऊ देणार नाही. सातत्यानं काही लोकं सांगतात,लाडकी बहीण योजना बंद होणार, मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत देवाभाऊ आहे, शिंदे साहेब आहेत, अजित दादा आहेत, तोपर्यंत लाडकी बहीण योजना आम्ही कधीच बंद होऊ देणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आमच्या लाडक्या बहिणींना दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्यानं मिळत राहील, हा विश्वास देतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आमच्या शेतकऱ्यांना वीज सवलत आम्ही दिलेली आहे. विजेचं बिल जे माफ केलेलं आहे, पाच वर्ष आमच्या शेतकऱ्यांना विजेचं कुठलंही बिल भरावं लागणार नाही, हे पुन्हा एकदा सांगतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पाच वर्षांनी तुम्ही आमचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केला तर अजून पाच वर्षापर्यंत तुम्हाला सवलत देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आतातरी पाच वर्षापर्यंत वीज सवलत ठेवलेली आहे. सौरऊर्जाकरण करतोय, त्यानंतर 2026 च्या डिसेंबरमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना 365 दिवस, दिवसा 12 तास वीज आणि मोफत वीज दिल्याशिवाय राहणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आमच्या सगळ्या उपसा सिंचन योजना सोलरवर टाकणार आहोत. आमच्या उपसा सिंचन योजनांना सोलरची वीज मिळाल्यानं सातत्यानं बील भरलं नाही म्हणून जे संकट येतं त्या उपसा सिंचन योजनांना देखील संकटातून बाहेर काढण्याचं काम राज्य सरकार म्हणून आम्ही करणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आणखी वाचा