उधारीवर सिगारेट न दिल्याने दुकानदारावर चाकूहल्ला
टिटवाळा परिसरातील बनेली कोकणनगरमधील घटना
टिटवाळा, ता. २५ (वार्ताहर) : कल्याण तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बनेली कोकणनगर परिसरात उधारीवर सिगारेट न दिल्याच्या क्षुल्लक वादातून एका तरुणाने दुकानदारावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात दुकानदारासह अन्य एक जण जखमी झाला असून, त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
श्रीकांत यादव आणि रमाकांत यादव अशी जखमी दुकानदारांची नावे आहेत. हसन शेख (वय १९) असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. मंगळवारी (ता. २१) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपी शेख नेहमीप्रमाणे परिसरातील दुकानात सिगारेट मागण्यासाठी गेला. त्याने उधारीवर सिगारेट मागितली असता दुकानदारांनी ‘उधारी वाढली आहे, पैसे दिल्याशिवाय सिगारेट मिळणार नाही,’ असे स्पष्ट सांगितले. यावरून दोघांमध्ये तीव्र वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर झटापटीत झाले आणि आरोपीने सोबत असलेला चाकू काढून दोघांवर वार केले.
सभोवतालच्या शेजाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप केला नसता, तर हा हल्ला अधिक गंभीर व जीवघेणा ठरला असता, असे स्थानिकांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आरोपीविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
गैरकृत्ये करणाऱ्यांची गय नाही
टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांना विचारले असता, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच त्या भागासह अन्य ठिकाणीदेखील गस्त वाढवण्यात आली आहे. अशा पद्धतीने अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. अशा गैरकृत्ये करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.